“त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे”, मुख्याधिकारी जीवन पाटील यांचे आवाहन
विनायक पाटील
पेण : पेण नगरपालिकेकडून नोटीस बजावूनही नागरिक आपला जीव मुठीत धरून जुन्या पडझड झालेल्या तसेच धोकादायक इमारतीमध्ये राहत असल्याने पावसात या धोकादायक इमारती कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने नगरपालिकेकडून यावर्षी डेंजरझोन मध्ये असलेल्या एकूण ५१ इमारतींना नोटीस देण्यात आल्या आहेत. यात १४ जुन्या झालेल्या तर ३७ धोकादायक इमारतींचा समावेश आहे.
धोकादायक इमारतीमध्ये राहत असलेल्या नागरिकांनी त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील यांनी केले आहे.
यावर्षी लवकरच मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यात पावसाचा जोर वाढून धोकादायक इमारतींना याचा मोठा फटका बसून इमारती कोसळण्याची घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी नगरपालिकेकडून पेण नगरपालिका हद्दीतील धोकादायक अश्या ५१ इमारती मालक, सोसायटी यांना नोटीस देऊन सुरक्षिततेबाबत आवाहन करण्यात आले आहे.