• Wed. Jul 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता जड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी

ByEditor

Jun 4, 2025

रायगड : श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून दि. 5 जून रोजी सायं. 4 ते दि. 6 जून 2025 रोजी रात्रौ 10 वाजेपर्यतच्या कालावधीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा नागोठणे ते कशेडीपर्यंत तसेच माणगांव-निजामपुर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघर फाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावरील होणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतुक बंदी अधिसूचना जारी केली आहे.

श्री शिवराज्याभिषेक सोहळा – 2025 हा कार्यक्रम दि. 5 जून व दि. 6 जून रोजी किल्ले रायगड येथे साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी रायगड, पुणे, सातारा, कोल्हापुर, मुंबई वगैरे ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने श्री शिवभक्त हे आपआपली वाहने घेवून येत असतात. तसेच सदर कार्यक्रमाकरीता आयोजकांच्या सामानाची वाहने देखील मोठ्या प्रमाणात श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येत असतात. या सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त हे रायगड किल्ला येथे माणगांव-निजामपुर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला असे जाण्याचे एकूण तीन मार्ग आहेत. या मार्गावरून शिवभक्त हे आपआपल्या वाहनाने मोठ्या संख्येने येत असतात. तसेच शासकीय यंत्रणा यांच्या वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. सदर शिवभक्तांची वाहने ही मुंबई – गोवा महामार्गावरून कशेडी घाट ते महाड, तसेच वाकणफाटा-नागोठणे-कोलाड-माणगांव-महाड या महामार्गावरून येत असतात. त्यातच मुंबई – गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची देखील प्रचंड प्रमाणात वाहतूक होत असते अशावेळी अपघात, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या कार्यकमाच्या वेळी कोठे ही वाहतुक कोंडी निर्माण होवू नये व श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जिल्हाधिकारी जावळे वाहतूक बंदी जाहीर केली आहे. सदरची वाहतूक बंदी अधिसूचना ही दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तु वाहून नेणारी वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहीका या वाहनांना लागू राहणार नाही. या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. जावळे यांनी दिले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!