अभय पाटील
बोर्ली पंचतन : टीका करणाऱ्या आमदारांच्या निवडणुका होइपर्यंत सुनील तटकरे चांगले आणि जेव्हा पालकमंत्री पदाचा विषय आल्यानंतर सुनील तटकरे वाईट हे रायगडमधील शिवसेनेच्या दोन आमदार व मंत्री भरत गोगावले यांनी दाखवून दिले आहे. तसेच स्वतःच्या मुलीच्या प्रचारात कमी पण मित्र पक्षाच्या प्रचारात जास्त घालून महायुतीचे उमेदवार कसे जास्त निवडून येतील यासाठी प्रयत्न करून देखील मित्र पक्षाच्या आमदारांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका करावी हे निषेधार्ह आहे असे वक्तव्य श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष महमद मेमन यांनी केले. दिवेआगर येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
महायुतीतील आमदारांकडून खासदार सुनील तटकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा श्रीवर्धन राष्ट्रवादी पक्षाकडून तीव्र निषेध करण्यात आला. यासाठी दिवेआगर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष महमद मेमन, माजी सरपंच उदय बापट, माजी सभापती लाला जोशी, उपाध्यक्ष श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सचिन किर, मुख्य संघटक नंदू पाटील, जिल्हा सरचिटणीस महिला राष्ट्रवादी काँग्रेस ज्योती परकर, उपाध्यक्षा श्रीवर्धन महिला राष्ट्रवादी काँग्रेस ज्योत्स्ना हेदुकर, बोर्ली पंचतन शहराध्यक्ष संजीवनी श्रीवर्धनकर, सुजित पाटील, प्रकाश तोंडलेकर उपस्थित होते.
मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी पुन्हा एकदा महायुतीतील वाद समोर आला आहे. या कार्यक्रमांमध्ये नेत्यांनी केलेल्या वक्तव्याने श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या वतीने मंगळवारी दिवेआगर येथील पत्रकार परिषदेत घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. युतीतील सहकारी पक्षाकडून वेळोवेळी वादग्रस्त भूमिका योग्य नाही असे मत या परिषदेत प्रत्येक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आले.
