रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात; गर्दीचा नवा उचांक
६ जूनचा शिवराज्याभिषेक वैचारिक क्रांती करणारा सोहळा –युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज
मिलिंद माने
किल्ले रायगड : ३५२वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर जल्लोषात साजरा झाला. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली होती. आजच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याने मागील वर्षीच्या तुलनेत गर्दीचा विक्रम मोडल्याचे चित्र रायगडावर पाहावयास मिळाले. पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणात ढोल, ताशे, नगारे,कोकणातील खालुबाजा व शासनकाठी आणि पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले शिवभक्त यामुळे पुन्हा शिवकाळ अवतरला असे चित्र संपूर्ण रायगडावर पाहावयास मिळाले.

किल्ले रायगडावर आज ३५२ वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाला. गेली दोन दिवस किल्ले रायगडावर पारंपारिक मर्दानी खेळ, पोवाडे, जागरण, गोंधळ आणि ढोल-ताशे, नगारे यांच्या आवाजाने शिवकाळ जागा झाला होता. श्रीशिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने गेल्या अनेक वर्ष रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावर्षी देखील समितीने अत्यंत नियोजनबद्ध असे दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले. गडावर या निमित्ताने लाखो शिवभक्त दोन दिवस आधीच दाखल झाले होते. यामुळे संपूर्ण रायगड छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

मागील वर्षाच्या गर्दीच्या तुलनेत यंदा गर्दीने विक्रम मोडल्याचे चित्र जागोजागी शिवभक्तांच्या थव्याने पाहावयास मिळाले. दिनांक 6 जून रोजी किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त गडावर दाखल झाले होते.

राज सदरेवर या सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर समोर बसलेल्या लाखो शिवभक्तांनी एकच जल्लोष केला. शिवराज्याभिषेक गीताने या सोहळ्याची सुरुवात झाली. विधिवत पूजा केल्यानंतर महाराष्ट्रातील विविध नद्यांच्या आणलेल्या जलाने अभिषेक करण्यात आला. यावेळी संभाजी राजे भोसले आणि त्यांचे पुत्र शहाजीराजे भोसले हे उपस्थित होते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आमदार संजय गायकवाड, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह विविध शासकीय अधिकारी देखील उपस्थित होते. युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पालखीचे आगमन राजसदरेवर झाले. राज सदरेवरील उत्सवमूर्तीस अभिषेक करण्यात आला. येथील छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला.

यावेळी लाखो शिवभक्तांना मार्गदर्शन करताना संभाजी राजे भोसले यांनी हा शिवराज्याभिषेक म्हणजे वैचारिक क्रांतीचा सोहळा असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचा विचार भावी पिढीला देण्यासाठी शिक्षणाची गरज असल्याचे सांगून शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये महाराजांच्या विषयावरील अभ्यासक्रम असणे गरजेचे असल्याचे सांगितले. छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न होत नसल्याची खंत व्यक्त करत शासनाने हे गड किल्ले आमच्या ताब्यात द्यावेत, या गडकिल्ल्यांचे जतन करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो असे स्पष्ट केले. शासनाने हा सोहळा राष्ट्रीय दिन म्हणून देखील साजरा केला पाहिजे असे संभाजीराजे भोसले यांनी सांगितले.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासह त्यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्यानिमित्ताने महाराजांचे आशीर्वाद घेतल्याचे सांगत यापुढे देखील आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर धरून आरक्षणाचा हा लढा आपण कायम लढणार असल्याचे स्पष्ट केले.

शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर यावेळी बोलताना म्हणाले की, सहा जून ही तारीख निसर्गाच्या मनात कोरलेली आहे. हा शिवराज्याभिषेक सोहळा वैचारिक क्रांती करणारा आहे. शासनाने गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष केले आहे. गड किल्ल्यांचा निधी हा शासनाकडून वेळेवर उपलब्ध होत नाही. यासाठी शासनावर दबाव आणला पाहिजे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जो कोणी चुकीचे वक्तव्य करेल त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी शिवभक्तांची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
