विश्वास निकम
कोलाड : मुंबई गोवा महामार्गावर विशेषतः इंदापूर ते सुकेळी दरम्यान मोकाट गुरांना वालीच नसल्याचे अनेकदा समोर आले आहे, तर दुसरीकडे मार्गावरच ठाण मांडून बसणारी ही मोकाट गुरे अपघाताला कारणीभूत ठरत असून, या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गावर आंबेवाडी-कोलाड नाक्यावर, भिरा फाटा, तटकरे कॉम्प्लेक्स, हॉटेल प्रभाकर, कोलाड पोलिस चौकी, इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर तसेच खांब, सुकेळी खिंड अशा ठिकाणी ही जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्याने अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहेत. या मोकाट गुरांचे बेजबाबदार मालक आहेत तरी कोण? असा प्रश्नकरीत येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्यामुळे सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे.
कोलाड-आंबेवाडी नाक्यावरील आठवडाबाजारपर्यंत असंख्य मोकाट जनावरे फिरत असून, ही जनावरे अपघाताला निमंत्रण देत आहेत. गेल्या महिनाभरात अनेक छोटे मोठे अपघात या मोकाट जनावरांमुळे घडले असल्याचे समजते. घडलेल्या अपघातात दुचाकीवर प्रवास करणारे प्रवाशी जखमी झाले आहेत. तसेच मोठ्या वाहनांमुळे गुरे दगावण्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत.
कोलाड आंबेवाडी नाक्यावर महामार्ग चौपारीकरण, उड्डाण पूल, मार्गालगत नवीन गटार लाईन खोदकामे सुरू आहेत. काही बनवली गेलेली गटारे व त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यांची झाकणे तुटल्याने काही मोकाट गुरे सैरावैरा पळत असताना त्यात देखील पडत आहेत. रात्रीच्या सुमारास अंधारात ही गुरांचा कळप मार्गाच्या मध्यभागी उभा अथवा बसलेली असतात. हि गुरे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. या मोकाट गुरांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून तसेच स्थानिक ग्रामस्थ नागरिक यांच्याकडून केली जात आहे.
मुंबई-गोवा हायवेवर मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. ही उनाड गुरे दिवसा जवळच असलेल्या जंगलात जातात व सायंकाळी ७ च्या नंतर रस्त्यावर ठाण मांडून बसतात. ही रस्त्यात बसलेली गुरे रात्रीच्या अंधारात दिसत नसल्याने अनेकवेळा वाहनांमुळे गुरे जखमी होतात तर अनेक गुरे दगवतात. कधी वाहनचालक जखमी होताना दिसत आहेत. यामुळे उनाड गुरांचा बंदोबस्त करून त्यावर संबंधितांकडून उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
गुरांच्या मालकांनी आपल्या गुरांची काळजी घेणे आवश्यक आहे. गुरांना मोकाट रस्त्यावर सोडू नये. मधल्या काळात कोलाड पोलिसांनी यावर कारवाई करून उपाययोजना सुरू केल्या होत्या, तसेच मालकांना आवाहन करून आपली गुरे ताब्यात घ्यावी अन्यथा ती गो शाळेत धाडण्यात येतील अशी भूमिका घेण्यात आली होती. मात्र याकडे पुन्हा कानाडोळा होत असल्याने पुन्हा संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
-संदीप माने
ग्रामस्थ
याबाबत अनेकदा ग्रामपंचायतीत तसेच पोलीस ठाण्यात मोकाट गुरांबाबत उपाययोजना करण्यात यावी तसेच त्यांचे मालक कोण याबाबत माहिती दिली होती. मात्र त्याकडे ग्रामपंचायत अधिकारी वर्ग तसेच गुरांचे मालक दुर्लक्ष करत आहेत. आता हा अत्यंत गंभीर आणि प्रवाशी वर्गाच्या जीवाशी निगडित प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच्या गुरांच्या तिप्पट या गुरांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाढते अपघात टाळण्यासाठी शिवसेना ठाकरे गट तसेच ग्रामस्थ याबाबत संबधीत खात्याकडे निवेदन देणार असून यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
-चंद्रकांत लोखंडे
उप तालुकाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)
