• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोह्यातील २७ वर्षीय दानियाल चोगले ठरला कोकणातील पहिला एअरक्राफ्ट इंजिनियर

ByEditor

Jun 10, 2025

शशिकांत मोरे
धाटाव :
रायगड जिल्हा अल्पसंख्यांक विकास मंच आणि रोहा एज्यू. अँड वेल्फ. असोसिएशन या संस्थेचे उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते सलीम चोगले यांचे चिरंजीव दानियाल चोगले याने वैमानिक क्षेत्रात गरुडझेप घेत रोह्याचे नाव उज्वल केले आहे. अवघ्या २७व्या वर्षी त्याने एव्हीएशन क्षेत्रात महत्वपूर्ण यश मिळविले असून ए ३२० ते एटीआर या दोन्ही विमानांवर अधिकृत स्वाक्षरीचे अधिकारी मिळविणारे कोकणातील पहिले एअरक्राफ्ट इंजिनियर ठरले आहेत. तरुण वयात वैमानिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतल्याबद्दल दानियाल चोगले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दानियाल चोगले याने नर्सरीपासून इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षण रोह्यातील जे. एम. राठी स्कुल आणि ज्युनियर कॉलेज या शाळेत पूर्ण केले. बालपणापासून वैमानिक क्षेत्राची आवड असणाऱ्या दानियाल याने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले. त्याठिकाणी हिंदुस्थान एरोस्पेस अँड इंजिनिअरिंग कॉलेजमधून एअरक्राफ्ट इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांचा व्यवसायिक प्रवास विस्तारा एअरलाईन्स या कंपनीतून सुरु झाला. या ठिकाणी साडे तीन वर्ष सेवा दिल्यानंतर अनुभवाच्या जोरावर त्यांनी नावाजलेल्या इंडिगो एअरलाईन्स या कंपनीच्या सेवेत रुजू झाले. या ठिकाणी नोकरी करित असताना त्यांनी ऍडवान्सड एअरबस ए ३२० आणि एटीआर ७२ विमाननांवर तांत्रिक जबाबदारी संभाळत आहेत. दानियाल चोगले याने वैमानिक क्षेत्रात घेतलेली गरुड झेप तरुणांसाठी एक प्रेरणा असून मोठी स्वप्न उराशी बाळगून व ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली तर यश नक्कीच मिळते हे त्याने सिद्ध करुन दाखवले आहे.

दानियालच्या यशस्वी कामगिरीने रोह्याचे नाव देशपातळीवर पोहचले आहे. याबद्दल त्याचे सर्व समाजातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

मी रोह्यासारख्या छोट्याशा गावात जन्म घेतला असून जिथे विमान फक्त आकाशातून दिसते. माझे वडील सलीम, आई तबस्सूम, बहीण मेहवीश यांनी केलेले सहकार्य आणि रोहेकर जनतेच्या आशिर्वादामुळे मी आतापर्यंत मजल मारली आहे. सर्वांनी दिलेली साथ माझ्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि काम करण्यासाठी नवीन उमेद देत असते.
-दानियाल चोगले

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!