• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडात शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रंगलीय जोरदार जुगलबंदी

ByEditor

Jun 10, 2025

रायगडच्या पालकमंत्री पदाचा हक्क शिवसेनेचाच -युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्ही प्रामाणिक काम केले -तालुकाप्रमुख महेंद्र मानकर

आमच्या अंगावर कोणी आल्यास त्यांना शिंगावर घेण्याची आमची ताकद -उपतालुकाप्रमुख नितीन पवार

भरतशेठकडे फेऱ्या मारणाऱ्या शादाब गैबीने शिवसेनेला इशारा देऊ नये -प्रताप घोसाळकर

सलीम शेख
माणगाव :
रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील संघर्ष टोकाला गेला असून या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे आरोपांच्या फैरी झाडत असून येणाऱ्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकांत आम्हीच बाजी मारू असे बोलून या निवडणुकांबाबत एकमेकांनी चॅलेंज स्वीकारले आहे.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून या दोन्ही पक्षांत नॅपकिन विषयावरून वादाची मोठी ठिणगी पडल्याने जिल्ह्यात सर्वत्र हा चर्चेचा विषय बनला आहे. दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन करून इशारे देत आहेत. शिवसेनेने गुरुवार, दि. ५ जून रोजी माणगावात पत्रकार परिषद घेऊन खा. सुनील तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टिका केली होती. त्या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माणगावात शुक्रवार, दि. ६ जून रोजी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारून शिवसेना शिंदे गटाने मंगळवार, दि. १० जून २०२५ रोजी माणगावात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला खुले आव्हान दिले.

या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा हक्क हा शिवसेनेचाच असून भरतशेठच जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत हि संपूर्ण रायगडवासियांची इच्छा असून राष्ट्र्वादीतील काही कार्यकर्तेही आमच्याजवळ खाजगीत बोलताना भरतशेठचाच पालकमंत्री पदाचा अधिकार असल्याचे बोलत आहेत असे सांगितले.

शिंदे गटाचे माणगाव तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्ही आमचे नेते ना. भरतशेठ गोगावले यांच्या आदेशाने सुनील तटकरे व अदिती तटकरे यांचे प्रामाणिक काम केले असे सांगत उपतालुका प्रमुख नितीन पवार यांनी शिवसेनेच्या अंगावर कोणी आल्यास त्यांना शिंगावर घेण्याची आमची ताकद असल्याचे सांगितले. जेष्ठ शिवसैनिक प्रताप घोसाळकर यांनी भरतशेठकडे कामासाठी फेऱ्या मारून त्यांच्या घराचे उंबरठे झिजवणाऱ्या शादाब गैबीने शिवसेनेला इशारा देऊ नये, आम्ही त्याचे आव्हान स्वीकारतो पण आम्हाला आव्हान देणे तुमचे काम नाही, तुम्ही सांगाल तेथे केव्हाही येण्यास आम्ही तयार आहोत असे सांगितले. या पत्रकार परिषदेला शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख राजेश कदम, ॲड. सुशील दसवते, लोणेरेचे माजी सरपंच रवींद्र टेंबे, जगदीश दोशी, समाधान करकरे, निलेश केसरकर, दाऊद मापकर, संतोष पोळेकर, रोहित रातवडकर, अजित खेडेकर, प्रफुल्ल खरंगटे, दाऊद मापकर, सचिन शिगवण आदी शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे पुढे म्हणाले कि, रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद होत आहे. आमचे नेते ना. भरतशेठ गोगावले, आ. महेंद्र थोरवे, आ. महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यावर खा. तटकरे साहेबांनी बोलणे गरजेचे होते. परंतु याबाबतीत जिल्ह्यातील त्यांचे कार्यकर्ते आमच्या नेत्यांवर टिका करतात हे दुर्दैवी आहे. रोह्याचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, ॲड. सायली दळवी, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आमच्या नेत्यांवर तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर टिका करतात. याबद्दल आम्हा शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ते टिका करीत असताना दंडेलशाहीची भाषा वापरतात. आमची तटकरे साहेबांवर बोलण्याची पात्रता नाही मग तुमच्या पदाधिकाऱ्यांची उंची एवढी कशी? जे आमच्या नेत्यांवर टिका करतात. लोकसभा निवडणुकीत तटकरे साहेबांच्या प्रतिकूल परिस्थिती असताना या निवडणुकीत भरतशेठनी पुढाकार घेऊन त्यांच्या आदेशाने आमचे संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर व आम्ही सर्व शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेऊन महायुतीचा धर्म पाळून प्रामाणिकपणे काम केले. असे प्रामाणिकपणे काम केले असतानाही आम्हाला कोणी आव्हान देत असेल तर आम्ही ते स्वीकारतो असे उभारे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना तालुकाप्रमुख महेंद्र मानकर म्हणाले कि, ६ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आमचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चाळके व जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यावर जी जाहीर टिका काका नवगणे, दिपक जाधव यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली त्या टिकेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. खा. तटकरे साहेबांनी महाडच्या कार्यक्रमात जी नक्कल केली त्यावरून हा वाद सुरु झाला. शादाब गैबी म्हणतात आम्ही शिवसेना कार्यकर्त्यांना फिरू देणार नाही. पण का फिरू देणार नाही? आम्ही तुमचं काही खाल्लं आहे का? आम्ही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ना. भरतशेठ यांच्या आदेशाने प्रामाणिकपणे काम केल्याचे ते म्हणाले.

उपतालुकाप्रमुख नितीन पवार म्हणाले कि, आमच्या नेत्यांवर टिका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध व्यक्त करतो. राष्ट्रवादीचे पदाधिकारी जर आमच्या नेत्यांना गर्भित इशारा देत असतील तर शिवसेनेचा इतिहास सर्वांना माहित आहे. याकरिता असे इशारे आम्हाला कोणी देऊ नये. तटकरे साहेबांनी नॅपकिनची नक्कल करण्यापेक्षा विकासकामे करावीत. लोकसभा निवडणुकीत आम्ही जनतेला विकासकामांची आश्वासने दिली. विधानसभा निवडणुकीत निजामपूर भागातील राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने स्नेहल जगताप यांना आघाडी मिळवून देण्याची भीष्म प्रतिज्ञा केली होती. आघाडी न दिल्यास राजकारण सोडेन असे सांगितले होते. अशा लोकांनी आमच्या नेत्यांवर बोलू नये असे पवार यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!