मुंबई : गुरुवारचा दिवस हा अत्यंत वाईट ठरला. अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले. 242 जणांना घेऊन जाणाऱ्या या विमानामध्ये 2 वैमानिक आणि 10 क्रू मेंबर्स असे मिळून एअर इंडियाचे एकूण 12 कर्मचारी होते. या कर्मचाऱ्यांमध्ये मैथिली पाटील आणि अपर्णा महाडिक या दोन मराठी महिलांचाही समावेश होता. यातील अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या नात्यातल्या आहेत.
अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंच्या यांचा सख्खा भाचा अमोल याच्या पत्नी असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेबद्दलची माहिती मिळताच सुनील तटकरे हे तातडीने अहमदाबादला रवाना झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर अहमदाबाद विमानतळ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री 9.25 वाजता नागपूर येथून अहमदाबादला जाणारे विमान रद्द करण्यात आले आहे. तसेच अहमदाबादहून नागपूरला सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी निघणारे विमान देखील रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे नागपूरला येणारे आणि अहमदाबादला नागपूरहून जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. नागपूर येथून अहमदाबादसाठी सकाळी 8.35 वाजता आणि रात्री 9.25 वाजता विमान आहे. तर नागपूरसाठी अहमदाबाद येथून पहाटे 5.50 वाजता आणि सायंकाळी 6.55 वाजता विमान आहे.
एअर इंडियाच्या माहितीनुसार, बोइंग 787-8 विमानाने दुपारी 1:38 वाजता टेकऑफ केले होते. यात 242 प्रवासी होते, ज्यामध्ये 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी होते. यापैकी 169 प्रवासी भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर आदळले, ज्यामुळे हा अपघात घडला. त्यामुळे हॉस्टेलमधील 20 विद्यार्थांचा देखील मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या या विमान अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.