विठ्ठल ममताबादे
उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत राज्य शासनाचा ठराव दोन्ही विधिमंडळांनी मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविला असून, या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव दिले जाईल, असे ठाम आश्वासन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे.
भाजप प्रदेश मुख्यालय, नवीन नरिमन पॉईंट येथे आयोजित जनता दरबारात नामकरणासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते – राजेश गायकर (कामोठे), विनोद म्हात्रे (उरण-जासई), किरण पवार (कोल्ही कोपर), शरद ठाकूर (माजी उपसरपंच, धुतुम) यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी विमानतळाच्या नामकरणाविषयी निवेदन सादर केले आणि सदर घोषणा कधी होणार, याबाबत विचारणा केली.
त्यावर मंत्री मोहोळ यांनी स्पष्ट केले की, “राज्य सरकारचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय कॅबिनेटकडे पाठविला आहे. मंजूरी मिळाल्यावर हा प्रस्ताव आमच्या मंत्रालयात परत येईल आणि त्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येईल.”
विनोद म्हात्रे यांनी नावाबाबत दुसऱ्या पर्यायांच्या चर्चा सुरू असल्याचा उल्लेख केला असता, मंत्री मोहोळ यांनी स्पष्टपणे सांगितले की, “दिबा पाटील यांच्या नावाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही नावाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेला नाही, आणि केंद्र सरकारकडून दुसऱ्या नावाचा विचारही करण्यात आलेला नाही.”
