• Sun. Jul 13th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबाग-रेवदंडा मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात; एमएसआरडीसीकडून ‘स्लॅग’चा वापर करत डागडुजी

ByEditor

Jul 9, 2025

अमूलकुमार जैन
अलिबाग :
अलिबाग-रेवदंडा मार्गावरील खड्ड्यांची दयनीय अवस्था आता गंभीर रूप घेत असून, एमएसआरडीसीकडून रस्त्याच्या डागडुजीसाठी जेएसडब्ल्यू उद्योग समूहाकडून बाहेर टाकण्यात येणाऱ्या ‘स्लॅग’चा वापर केला जात आहे. रेडिमिक्स डांबराऐवजी अशा औद्योगिक कचऱ्याचा वापर करण्यात आल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या ‘जावईशोधी’ डागडुजीबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून, यामुळे दुर्घटनांची शक्यता अधिकच वाढली आहे.

पावसाळ्यानंतर रस्त्यांवरील पृष्ठभाग कोसळल्यामुळे काही खड्डे चार ते पाच फूट लांब व दोन फूट खोल झाले असून, काही ठिकाणी खड्डे दगड टाकून तात्पुरते भरण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे वाहनचालकांचे हाडे खिळखिळी झाली असून रस्त्यांची अवस्था गावरस्त्याहूनही वाईट झाली आहे. अपघाताची संख्या रोज वाढत असून वाहतूक कोंडी ही मोठी अडचण झाली आहे.

हा मार्ग नागाव, मुरुड या पर्यटनस्थळांना जोडणारा एकमेव दुवा आहे, ज्यावर अवजड वाहनांचीही रेलचेल असते. अशा स्थितीत स्लॅगचा वापर करून डागडुजी करणं म्हणजे वाहनचालकांच्या जीवाशी खेळ असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दुचाकीस्वार आणि पादचारी सतत घसरत असून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात न आल्याचा आरोप आहे. वाहनधारकांकडून डांबर व खडी वापरून दर्जेदार डागडुजीची मागणी जोर धरत आहे.

“दिवसभरात रस्त्यावरील खड्डे सिमेंट काँक्रिटने भरले जातील. वाहनचालकांचा जीव आम्हाला महत्वाचा आहे. त्यांना त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल”.
बसवंत सिंग
कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!