अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील महसूल व वन विभागांतर्गत असलेल्या भूमि अभिलेख कार्यालयातील कामकाजाबाबत नागरिक आणि शेतकऱ्यांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासकीय वेळेनुसार कार्यालय उघडले जात नसल्यामुळे, तसेच अनेकदा कार्यालय बंद ठेवले जात असल्यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांना आपली जमीनसंबंधीची कामे करण्यासाठी सतत हेलपाटे मारावे लागत आहेत.
भूमि अभिलेख कार्यालयामार्फत जमिनीच्या नोंदी, मालमत्ता विभाजन, मालकी हक्क वाद निवारण, सर्वेक्षण, नकाशा इत्यादी महत्त्वाची कामे केली जातात. त्यामुळे शेतकरी वर्ग नियमितपणे या कार्यालयात येत असतो. मात्र, उप अधिक्षक एम. आय. अत्तार यांच्याकडून कार्यालयात वेळेवर अनुपस्थित राहण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाया जात असून संतापाची लाट पसरत आहे.
या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील शेतकरी वर्गाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कामचुकारपणाबाबत तात्काळ विभागीय चौकशी करून उप अधिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, उप अधिक्षक एम. आय. अत्तार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी अलिबाग येथे गुरुवारी महत्त्वाच्या मिटिंगसाठी गेलो आहे. शासकीय वेळेनुसार कार्यालय उघडण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना देतो.”
नागरिकांनी प्रशासनाकडे अपेक्षा व्यक्त केली आहे की, भूमि अभिलेख कार्यालयाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करून सामान्य शेतकऱ्यांचे हक्काचे काम वेळेवर पूर्ण व्हावे.
उप अधिक्षक एम. आय. अत्तार हे फक्त भांडवलदारांची कामे करण्यासाठी कार्यालयात संध्याकाळी ये-जा करत असतात, ते सर्व सामान्य नागरिक शेतकरी यांना वेळ देत नाहीत. तसेच आज आम्ही खेड्यातून शेती संबंधातील कामे करण्यासाठी आलो तर कार्यालयाला १०.३० नंतरही टाळे. त्यामुळे न्याय कोणाकडे मागणार?
-विलास पाटील
शेतकरी
