माजी सैनिकाच्या मुलाचे सर्वत्र कौतुक
अभय पाटील
बोर्ली पंचतन, दि. १० : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावातील सुपुत्र सर्वेश श्रुती सुनील पारकर याने इंग्लंड येथील बांगोर युनिव्हर्सिटी मधून बँकिंग आणि फायनान्स या विषयात विशेष प्राविण्यासह पदव्युत्तर पदवी संपादन करून तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. मँचेस्टर येथे पार पडलेल्या भव्य पदवीप्रदान समारंभात सर्वेश याचा विशेष सन्मान करण्यात आला.
सर्वेश पारकर हे माजी सैनिक सुनील पारकर आणि अभिनेत्री श्रुती पारकर यांचे सुपुत्र असून अभ्यासात हुशार, मनमिळावू आणि संघटन कौशल्य असलेला विद्यार्थी म्हणून ओळखले जातो. त्याचे प्राथमिक शिक्षण मध्यप्रदेशातील आर्मी स्कूलपासून सुरू झाले. बोर्ली पंचतन येथील डॉ. ए. आर. उंड्रे प्रशालेत १ली-२री, तर पुढील शिक्षण पुणे जिल्ह्यातील कांतीलाल शहा विद्यालय व नोव्हेल इन्स्टिट्यूट आकुर्डी येथे पूर्ण झाले. गरवारे कॉलेज, पुणे येथून बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये पदवी घेतल्यानंतर त्याने परदेशातून मास्टर्स करण्याचा निर्णय घेतला.
ऑनलाइन परीक्षांत उत्तम गुण मिळवत त्याला साडेचार लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळाली. शैक्षणिक कर्ज घेऊन, वर्षभर नियोजनपूर्वक तयारी करत सर्वेशने इंग्लंडमधील विद्यापीठासाठी प्रवेश मिळवला. पालकांनी सुरुवातीला शंका व्यक्त केली होती, मात्र त्याचा आत्मविश्वास आणि चिकाटी पाहून त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला.
शैक्षणिक प्रवासातच नव्हे, तर सामाजिक कार्यातही सर्वेशचे योगदान उल्लेखनीय आहे. भारतात असतानाही आणि इंग्लंडमध्येही तो नियमित रक्तदान करत असतो. आर्थिक क्षेत्रातील नवकल्पना आत्मसात केल्यामुळे त्याचे कौशल्य भविष्यात उद्योगजगतात मोलाचे ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.
सर्वेश पारकर याच्या उज्ज्वल यशाचे श्रीवर्धन आणि कोकण परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून गावकऱ्यांसह समाजाच्या सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एक माजी सैनिकाचा मुलगा जिद्दीने आणि अभ्यासाने सातासमुद्रापार पोहोचतो, हे अनेक तरुणांसाठी प्रेरणादायक आहे.
