• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरण : दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी १६ जुलै रोजी ठिय्या आंदोलन

ByEditor

Jul 11, 2025

विनायक पाटील
पेण, दि. ११ :
वरवणे (ता. पेण) येथील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडून सहा महिने उलटले, तरी संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्याने आता सामाजिक संस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली १६ जुलै २०२५ पासून तहसील कार्यालय, पेण येथे बेमुदत ठिय्या आंदोलन होणार असून, दोषींवर गुन्हे दाखल करावेत, चौकशी अहवाल व केमिकल अनालिसिस रिपोर्ट सार्वजनिक करावा अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नवरखेड यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी खुशबू ठाकरेचे वडील नामदेव ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, ग्राम संवर्धन समिती तांबडी सदस्य नरेश कडू, पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचे सी. आर. म्हात्रे सर, राजीव गांधी पंचायतीराज संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव नंदा म्हात्रे, महिला‌ फेडरेशनच्या मोहिनी गोरे, सत्यशोधक चळवळचे संदिप पाटील (गागोदे), आचार्य विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानच्या संगीताताई व वंदना जाधव आदी उपस्थित होते.

मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे –

  • खुशबू ठाकरेच्या मृत्यूचा चौकशी अहवाल व केमिकल रिपोर्ट तात्काळ पोलिसांना सादर करून सार्वजनिक करावा.
  • सदर अहवाल १६ जुलैपूर्वी सादर न झाल्यास अहवालाची वाट न पाहता दोषींवर गुन्हा नोंदवावा.
  • निष्काळजीपणाच्या आरोपांवर आधारित अधिकारी श्रीमती विखे यांना पदावरून कार्यमुक्त करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा.
  • खुशबूच्या पालकांना १० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी.
  • आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा.

खुशबूच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर लवकरात लवकर गुन्हे नोंद होऊन एका आदिवासी कन्येला न्याय देण्याच्या प्रक्रियेत आदिवासी समाजासह इतर समाजातील सर्व घटकांतील नागरिकांनी, राजकीय तथा सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दरम्यान, विधानसभा अधिवेशनात काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी हा प्रश्न चर्चेसाठी लावून धरला असून, ३० जुलैपर्यंत अधिवेशन सुरू असताना शासन यावर काय भूमिका घेते याकडे आदिवासी बांधवांसह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!