• Sat. Jul 12th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये भीषण अपघात; तरुण व तरुणीचा जागीच मृत्यू

ByEditor

Jul 12, 2025

प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह

घनःश्याम कडू
उरण :
तालुक्यातील पागोटे गावाजवळील पुलावर आज दुपारी दुचाकीवरील भीषण अपघातात एक तरुण व तरुणीचा जागीच मृत्यू झाला. एमएच-४३ सीजे-४०१० या क्रमांकाच्या दुचाकीवरून दोघे प्रवास करत असताना अचानक घडलेल्या अपघातात त्यांचे प्राण घटनास्थळीच गेले. दोघेही नवी मुंबई परिसरातील असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

या धक्कादायक घटनेने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, अपघाताचे नेमके कारण काय? याचे उत्तर अद्याप प्रशासनाकडे नाही. पुलावर रक्ताच्या थारोळ्यात तडफडणाऱ्या मृतदेहांची अवस्था या अपघाताच्या तीव्रतेची साक्ष देत आहे. वेळेवर मदतीचा हात कोणीच पुढे न केल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली.

उरण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला असून, मृतदेह इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र प्रशासनाचा अपघातापूर्वीचा निष्क्रियपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

उरण परिसरात अपघातांची साखळी सुरूच

पागोटे परिसरातील पुलावर ना गतिरोधक, ना सीसीटीव्ही, ना वेगमर्यादा यंत्रणा — अशा स्थितीत अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. दर महिन्याला याच रस्त्यावर एक जीव जातोय, पण प्रशासनाकडे फक्त प्रेसनोट काढण्याची तत्परता आहे. अपघातापूर्व उपाययोजना करण्यासाठी वेळ नाही, हे चित्र दुर्दैवी आहे.

स्थानिकांमध्ये संतापाची भावना

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष आहे. “रस्ता आहे, वाहनं आहेत, पण सुरक्षा कुठे आहे?” असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!