विश्वास निकम
कोलाड, दि. १२ : रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या सुरक्षित आणि शिस्तबद्ध आयोजनासाठी रायगड जिल्हा गोविंदा पथक असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून या असोसिएशनच्या अध्यक्षपदी कृणाल मोर्ले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
रायगडसह मुंबई परिसरात गोविंदा पथकांचा उत्सवात मोठा सहभाग असतो. मानाच्या दहीहंडींसाठी ठिकठिकाणी सराव सुरू असून, गोविंदांच्या प्रशिक्षणासाठी स्थानिक युवामंडळे पुढे सरसावली आहेत. गोविंदांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने असोसिएशनची निर्मिती करण्यात आली असून ती शासन नोंदणी क्र. रायगड / ००००१२०/२०२५ नुसार अधिकृतपणे नोंदवली गेली आहे.
संचालक मंडळाचा विस्तार पुढीलप्रमाणे करण्यात आला आहे:
अध्यक्ष: कृणाल मोर्ले
उपाध्यक्ष: जितेश कृष्णा भोईर
कार्याध्यक्ष: प्रमोद दिनाभाऊ जांबेकर
सचिव: संतोष कृष्णा भोईर
सहसचिव: शुभम नरेश पाटील
खजिनदार: प्रसाद प्रभाकर गोतावडे
सहखजिनदार: रोहन संतोष तांबे
सदस्य: योगेश रघुनाथ मोरे, संजय मनोहर पोईलकर, कौस्तुभ अशोक देवळेकर, अनघा मिलिंद खोत
या मंडळात हौशी व सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला असून उत्सवात सहभाग घेणाऱ्या बालगोपाल, गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही संस्था मार्गदर्शक आणि रक्षणात्मक भूमिका बजावणार आहे.
गोविंदा उत्सवाच्या तयारीला गती मिळत असताना, असोसिएशनच्या माध्यमातून कायदा-सुव्यवस्थेचे पालन करत उत्सव साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.