रायगड : जिल्ह्यातील कोर्लई समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या सहा दिवसांच्या शोधमोहिमे दरम्यान अखेर शुक्रवारी सायंकाळी ‘बोया’ सापडला असून हा महत्त्वपूर्ण सुरक्षात्मक उपकरण तटरक्षक दलाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सर्च ऑपरेशनमध्ये ३५००हून अधिक मच्छीमार बोटींची तपासणी करण्यात आली असून त्यातील ९२४ बोटी बेकायदेशीर असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.
सुरक्षेच्या शोधात आले धक्कादायक सत्य
६ जुलै रोजी कोर्लई किल्ल्याजवळ एक संशयित बोट आढळली होती. त्यानंतर सुरू झालेल्या सर्च ऑपरेशनमध्ये २८०० नोंदणीकृत बोटींमध्येही ६३७ बोटींचे मालक अनुपलब्ध होते, तर २८७ बोटी मत्स्य विभागात नोंदणीकृतच नव्हत्या. या बोटींची माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्त व सहआयुक्तांकडे कारवाईसाठी देण्यात आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी स्पष्ट केले.
‘बोया’ शोधमोहीम तांत्रिक यंत्रणांच्या सहकार्याने यशस्वी
‘बोया’ सौर ऊर्जेवर कार्यरत असून सतत जागा बदलत असल्याने त्याचा शोध घेणे अत्यंत कठीण झाले होते. रायगड पोलिस, तटरक्षक दल, बॉम्ब डिटेक्टर आणि अन्य सागरी सुरक्षा यंत्रणांनी रेवदंडा, अलिबाग, मुरुड, मांडवा आणि कोर्लई किनाऱ्यावर कडेकोट शोध घेतला. अखेर सव्वासहा वाजेच्या सुमारास कोर्लई समुद्रात ‘बोया’ सापडला आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बेकायदा बोटींविरोधात कठोर कारवाईचे संकेत
“सागरी सुरक्षा आणि मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी बोटींची नोंदणी अनिवार्य आहे. अप्रिय घटना घडल्यास मदतीसाठी नोंदवलेली माहिती अत्यावश्यक असते,” असा स्पष्ट संदेश जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, “९२४ बोटींमध्ये जोपर्यंत मालक समोर येत नाही तोपर्यंत त्या बेकायदा मानल्या जातील. याबाबत कोणतेही दुमत नाही.”
संपूर्ण प्रकरण सागरी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून भविष्यात अधिक काटेकोट देखरेख व डिजिटल नोंदणी यंत्रणा आवश्यक असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.