• Sun. Jul 13th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाचा २४ तासात शोध; खोपोली पोलिसांचा वेगवान तपास

ByEditor

Jul 13, 2025

मनोज कळमकर
खालापूर, दि. १३ :
मित्रांशी झालेल्या किरकोळ भांडणातून “पोलीस पकडतील” या गैरसमजुतीतून घरातून निघून गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा केवळ २४ तासांत शोध घेऊन त्याला सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात खोपोली पोलिसांना यश मिळाले. पोलिसांच्या तत्परतेबद्दल नागरिकांतून कौतुकाची भावना व्यक्त होत आहे.

क्रांतीनगर, खोपोली येथे राहणारा सिद्धार्थ (वय १५, विद्यार्थी, इयत्ता नववी) आठ जुलै रोजी मित्रांसोबत किरकोळ भांडणानंतर घरातून बाहेर पडला. “पोलीस आपल्याला पकडतील” या भीतीपोटी घर सोडल्याची शक्यता वडिलांनी खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार करून व्यक्त केली. तक्रार प्राप्त होताच रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली. निरीक्षक सचिन हिरे, सहनिरीक्षक सुजित गडदे, महिला उपनिरीक्षक पूजा चव्हाण, हवालदार संदीप चव्हाण आणि शिपाई समीर पवार यांनी तपास केला.

सिद्धार्थच्या शाळेबाहेरील मित्रांकडे चौकशीदरम्यान, तो नंदुरबारमधील जुबेरशी सतत संपर्कात असल्याचे समजले. जुबेरने सिद्धार्थचा फोन स्वारगेट, पुणे येथून आला असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी बसस्थानक परिसरात शोध सुरू केला.

घरातून बाहेर पडताना सिद्धार्थकडे पैसे नसल्याने त्याने खोपोलीहून कर्जतपर्यंत रेल्वेने, नंतर एक्स्प्रेसने पुण्यापर्यंत प्रवास केला. नंदुरबारला जाण्याच्या प्रयत्नात असतानाच शिपाई समीर पवार यांना गुलाबी शर्टमधील मुलगा संशयास्पद वाटला. वडिलांनी त्याला ओळखल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांची संवेदनशीलता

तपासादरम्यान उपाशी असलेल्या सिद्धार्थला ताब्यात घेतल्यावर प्रथम भरपेट जेवण देण्यात आले. नंतर त्याला खोपोलीमध्ये पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

ही घडलेली घटना खोपोली पोलिसांची तत्परता, सजगता आणि संवेदनशीलता अधोरेखित करणारी आहे. नागरिकांनी व पालकांनी पोलिसांचे विशेष कौतुक केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!