घनःश्याम कडू
उरण, ता. १३ : उरण तालुक्यातील तरुणी मैथिली पाटील हिचा अहमदाबाद विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला होता. अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी विविध मंत्री आणि प्रशासनाकडून “ही आमची मुलगी आहे”, “सरकार कुटुंबाच्या पाठीशी आहे” असे भावनिक उद्गार व्यक्त होत, मदतीच्या घोषणा मोठ्या थाटात करण्यात आल्या. मात्र त्या घटनेला आज महिना उलटूनही, त्या घोषणांचा एक रुपयाही मदतीचा लाभ तिच्या कुटुंबाला पोहोचलेला नाही.
मैथिलीच्या कुटुंबात तिचे आईवडील, दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. मैथिली ही सर्वात मोठी मुलगी होती. मैथिली पाटीलचे वडील पनवेलजवळील ओएनजीसीमध्ये कामगार आहेत. मैथिलीचे कुटुंबीय मदतीकरिता सरकारकडे आशेने पाहत आहेत. मात्र शासनाच्या निष्क्रियतेमुळे महिना उलटूनही कुटुंबीय मदतीपासून वंचित आहेत.
“संवेदनशीलतेचे” दिखावू चित्र
प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या सांत्वनाच्या भेटी, फोटोसेशन आणि टीव्हीवरील आश्वासने यापलीकडे प्रत्यक्ष मदतीसाठी कोणतंही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. भावनिक आश्वासनांची उजळणी झाली, पण त्यांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे मदतीच्या घोषणांचा अर्थ एक “ढोंगी स्वप्न” ठरला आहे.
लोकशाहीची गढूळलेली संवेदनशीलता
या प्रकारामुळे लोकशाहीत नागरिकांच्या व्यथा ऐकल्या जातात, परंतु उपाययोजना वेळेवर होत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मैथिली पाटीलच्या कुटुंबाच्या दुःखावर केवळ कॅमेऱ्यात टिपलेली आसवे आणि बातम्यांतील वल्गना राहिल्या आहेत; कृती मात्र अद्यापही शून्य आहे.