२ ऑगस्ट रोजी होणार प्रवेश; साबळे यांची पत्रकार परिषदेत माहिती
सलीम शेख
माणगाव : शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत ॲड. राजीव साबळे व माणगाव नगरपंचायत नगरसेवक यांना पैशाचे आमिष दाखवून खा. सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेत असल्याचे विधान केले होते. हे आरोप बिनबुडाचे असून आता कोणतीही निवडणूक नाही. तसेच शिवसेना प्रवक्ते हे पद नावापुरतेच माझ्याकडे आहे. मी कोणत्या पक्षाचं काम करावे हा माझा वैयक्तिक विषय आहे. मी सर्वांना आवाहन केलं आहे. ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे ते दि. २ ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. दिनांक २ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती ॲड. राजीव साबळे यांनी दि. १३ जुलै रोजी पत्रकार परिषदेत दिली. माणगाव शहरातील अशोकदादा साबळे लॉ कॉलेज येथे पत्रकार परिषदेला नगरपंचायतीचे पाणी पुरवठा सभापती कपिल गायकवाड, स्वीकृत नगरसेवक सुनील पवार, विरेश येरूणकर उपस्थित होते.
यावेळी ॲड. राजीव साबळे पुढे म्हणाले की, शिवसेनेचे प्रवक्ते पद हे फक्त नावापुरते माझ्याकडे होते. ते अनेकवेळा मी नाकारले व सोडण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात कोणताही मान त्या पदाला दिला जात नव्हता. मंत्र्याची भेट घेण्यासाठी वेळ देखील मिळत नव्हती. खा. सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कूलच्या उद्घाटनावेळी ५ कोटी सीएसआर निधी उपलब्ध करून देतो अशी घोषणा केली होती. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आम्ही नाराज नाही. परंतु, त्यांची भेट होऊन दिली जात नाही. अनेक कामे प्रलंबित आहेत. जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी किती शिक्षण संस्था चालवल्या आहेत. त्यांनी व अरुण चाळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना किती पैसे घेतले होते. ते आता आमच्यावर पैसे घेऊन पक्ष प्रवेश करत आहे, असे आरोप करत आहेत. त्यांना याबाबत कायदेशीर नोटीस बजावणार आहे. खा. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून सर्व कामे पूर्ण केली जातील, असा विश्वास त्यांनी दिला आहे.