शंभर टक्के रोजगार देण्याची हमी –अतुल म्हात्रे
विश्वास निकम
कोलाड, ता. १२ : रायगड जिल्ह्यातील वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकापचे राष्ट्रीय खजिनदार आणि शिवराज्य संघटनेचे प्रमुख अतुल नंदकुमार म्हात्रे यांनी उपस्थित युवकांना “शंभर टक्के रोजगार मिळेल,” अशी ग्वाही दिली.
कुणबी भवन, रोहा येथे शनिवारी संपन्न झालेल्या या मेळाव्यात जिल्ह्यातील पेण, पनवेल, अलिबाग येथील मेळाव्यांच्या यशस्वी आयोजनानंतर रोहा परिसरातील युवकांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यात आली. सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्रशिक्षणा सहित रोजगार देण्याचे प्रयत्न यशस्वी होत असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
कंपन्यांचा सहभाग आणि रोजगार संधी
कार्यक्रमाला Blinkit, गोदरेज, टाटा, एसबीआय आणि अन्य बँकिंग तसेच औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे एचआर प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी ITI फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशन, डिप्लोमा, इंजिनियरिंगसह 8वी पास ते पदवीधर उमेदवारांचा बायोडाटा संकलित करून थेट संवाद साधला. या संवादातून विविध स्तरांवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली.
मान्यवरांचे मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर होते. यावेळी जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, RDC बँकेचे संचालक गणेश मढवी, तालुका चिटणीस शिवराम महाबळे, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, महिला आघाडी प्रमुख कांचनताई माळी, रोशन पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे चिटणीस संतोष दिवकर, विकी कदम व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी रोजगार विषयक मौलिक मार्गदर्शन करत युवकांना प्रेरणा दिली.
मेळाव्याची सुरुवात संविधानपर प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक तालुका चिटणीस शिवराम महाबळे यांनी केले. सूत्रसंचालन विकी कदम यांनी तर आभार प्रदर्शन संतोष दिवकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने करण्यात आली.
मेळाव्यास सुमारे चारशे ते पाचशे बेरोजगार युवक-युवतींची उपस्थिती होती. त्यांच्या चेहऱ्यावर रोजगार मिळण्याची आशा आणि समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते. रोहा तालुक्यात प्रथमच झालेल्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.