घन:श्याम कडू
उरण : देशाच्या सुरक्षेवर गदा आणणाऱ्या काळाबाजारांवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) करडी कारवाई करत ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ मोहिमेत ७ कंटेनरमध्ये लपवलेले १०० टनांचे स्फोटक जप्त केले. न्हावा शेवा, मुंद्रा आणि कांडला बंदरांतून हे कंटेनर देशात आणले जात होते. या फटाक्यांची आयात मिनी डेकोरेटिव्ह प्लांट्स, कृत्रिम फुलं व प्लास्टिक मॅट्स म्हणून करण्यात आली होती. मात्र, DRI च्या तपासात लाल शिसे, लिथियम, तांबे ऑक्साईडसारखी धोकादायक रसायनं असलेल्या स्फोटकांचा मोठा साठा उघड झाला.
भारतीय स्फोटक नियम २००८ व विदेशी व्यापार धोरणानुसार, फटाक्यांची आयात ही प्रतिबंधित प्रकारात येते. तरीही परवाना न घेता स्फोटक माल डंप करण्याचा कट आखण्यात आला होता. यामुळे वाहतूक साखळी व सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असता. या कारवाईमागे असलेल्या एसईझेड युनिटमधील एका भागीदाराची ओळख पटवण्यात आली असून, त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नुसती तस्करी रोखली गेली नाही, तर देशाच्या सुरक्षेसाठी उभा राहिलेला एक धोका टाळण्यात यश मिळाले आहे.