सलीम शेख
माणगाव, ता. १४ : माणगावहून जामखेडकडे निघालेल्या एसटी बसला कोस्ते बुद्रुक गावाजवळ सोमवारी सकाळी ९.३० वाजता अपघात झाला. तीव्र वळणावर समोरून आलेल्या दुसऱ्या एसटी बसला चुकवताना नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याकडेला कलंडली. २९ प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये वाहन चालकासह ६ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघाताच्या क्षणी बसच्या काचा फुटून काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. जखमींना तातडीने माणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलवण्यात आले.
एमएच-१३ सीयू-६९३७ क्रमांकाची बस माणगाव बसस्थानकातून निजामपूर–स्वारगेटमार्गे जामखेडकडे निघाली होती. कोस्ते बुद्रुक येथे पुणेकडून येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसला चुकवताना चालक बाळासाहेब सखाराम जोडगे यांनी बस साईड पट्टीवर घेतली. गाडी स्लीप होऊन ती रस्त्याकडेला कलंडली. जखमींमध्ये दत्तू सुतार (८६), बाबू शिंदे (७०), विकास जाधव (७२), विठ्ठल ढोकळ, चालक बाळासाहेब जोडगे आणि वाहक सुनील केवड यांचा समावेश आहे.
घटनेनंतर माणगाव एसटी आगार व्यवस्थापक छाया कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्री. वाढवळ यांच्यासह कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य करून मार्ग मोकळा केला. माणगाव पोलीस या अपघातासंदर्भात तपास करीत आहेत.