अमूलकुमार जैन
अलिबाग : भारतीय हवामान खात्याने १५ जुलै रोजी रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला असून त्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
माणगांव, तळा, रोहा, पाली, महाड, पोलादपूर तालुक्यांमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली असून सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, आश्रमशाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे १५ जुलै रोजी बंद राहणार आहेत. तथापि, संबंधित शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत हजर राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कार्यात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
| दरम्यान, जिल्हा प्रशासनाचा सुट्टीसंदेश सकाळी साडेनऊच्या सुमारास शैक्षणिक संस्थांना मिळाला. तोपर्यंत अनेक विद्यार्थी शाळा गाठण्यासाठी घरातून निघाले होते. काही विद्यार्थ्यांनी मुसळधार पावसात शाळेपर्यंत प्रवासही केला होता. त्यामुळे पालक व शाळा व्यवस्थापनांची मोठी तारांबळ उडाली. पालकांनी ही सुट्टी पूर्वसूचना स्वरूपात शाळा सुरू होण्याआधी देण्यात यायला हवी होती, अशी नाराजी व्यक्त केली. |
