• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; १७ ग्रामपंचायतीवर महिला राज

ByEditor

Jul 15, 2025

अनंत नारंगीकर
उरण, ता. १५ जुलै :
उरण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी पंचायत समिती सभागृहात पार पडली. तहसिलदार डॉ. उद्धव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोडतीत नागरिक, पदाधिकारी आणि भावी सरपंच मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका शाळेतील विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या, आणि खेळीमेळीत वातावरणात प्रक्रिया पूर्ण झाली.

या सोडतीत १७ ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी आरक्षण ठरले असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही बाब उल्लेखनीय ठरली आहे. उरणमधील सर्वात मोठी चाणजे ग्रुप ग्रामपंचायत व चिर्ले ग्रामपंचायत यांचे सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आले आहे. तर रानसई ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमाती (महिला) वर्गासाठी ठरवण्यात आले आहे.

सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी विंधणे, सारडे, पागोटे, बांधपाडा, फुंडे, गोवठणे, पाणजे, धुतूम, चिरनेर, पुनाडे, नवघर ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत. नामनिर्देशित महिला प्रवर्गासाठी केगाव, पिरकोन, बोकडविरा, मोठी जूई आणि कळंबुसरे यांचा समावेश आहे.

याशिवाय, कोप्रोली, भेंडखळ, जसखार, घारापुरी, वशेणी, आवरे, दिघोडे, करळ, डोंगरी, नवीन शेवा आणि नागाव या ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी सरपंच निवडणूक होणार आहे. नामनिर्देशित खुल्या प्रवर्गात हनुमान कोळीवाडा, वेश्वी, म्हातवली आणि सोनार यांचा समावेश आहे.

आरक्षण प्रक्रियेसाठी निवासी नायब तहसिलदार महेश पाटील, नायब तहसिलदार नरेश पेडवी, नायब तहसिलदार रविंद्र सानम, माजी सभापती विश्वास म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते.

ही सोडत काहींना नव्या संधीचे दार खुले करणारी ठरली, तर काही हौशी उमेदवारांचे स्वप्न भंगले गेले. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांचा वाढता सहभाग ग्रामविकासासाठी सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!