• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडच्या रानमाळावर फुलांचा बहर; निसर्गप्रेमींसाठी उत्साहवर्धक पर्वणी

ByEditor

Jul 18, 2025

सलीम शेख
माणगाव, ता. १८ :
सततधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील रानमाळ फुलांनी नटली असून पर्यावरणप्रेमींना स्वर्गीय आनंद मिळत आहे. जंगलामध्ये फुललेली पिवळी, केशरी, गुलाबी आणि निळसर फुले निसर्गाच्या विविधतेचा मनोहारी अनुभव देत आहेत.

पावसाळ्यातील आल्हाददायक गारव्यात मालरानावर तेरडा, रान भेंडी, सोनकी, रान आलं, मोतीया, कवालीसारख्या अग्निफुलांचा मोहक बहर आला आहे. या वर्षी लवकर सुरू झालेल्या पावसामुळे श्रावणपूर्वीच अनेक वनस्पती फुलून आल्या आहेत. पर्यावरणातील अनुकूल बदलांमुळे साधारणतः ५० ते ६० विविध वनफुलांचा बहर या काळात दिसत आहे.

धार्मिक सणांमध्ये ‘या’ फुलांचा मोठा वापर

आषाढ, श्रावण व भाद्रपद महिन्यात रानफुलांचा बहर सर्वसामान्यपणे होतो. धार्मिक सणांमधील विधींसाठी या फुलांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याने स्थानिक संस्कृतीत त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

निसर्गप्रेमी व छायाचित्रकारांची माळरानात गर्दी

रायगड जिल्ह्यातील जंगलांचा हा नैसर्गिक ठेवा टिपण्यासाठी अनेक छायाचित्रकार मालरानात भेट देत आहेत. पानकुसुम, खाजकांदे, सफेद मूसली, कर्णफुल, रान हळद, सीतेची वेणी, अंजनी, भारंगी, कुड्याची व शेरवडसारख्या वनस्पतींनी जंगल फुलवले आहे.

पावसाळ्यात विविध प्रकारची रानफुले बहरली आहेत. तृण फुलांनी माळरानावर सुंदरता आणली असून हे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्याची मोठी संधी आहे. कोकणात निसर्गाची अद्भुत श्रीमंती असून रान फुलांचा पावसाळ्यातील बहर हा तर मोठा ठेवा आहे.याचे जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे. जंगल व माळरानात निसर्गाचा अद्भुत ठेवा आहे. विविध रंगाची ही फुले आकर्षक आहेत. अतिशय निसर्ग संपन्न या जंगलांचे संवर्धन व्हावयास हवे. या फुलांचा अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे.
-विलास देगावकर,
निसर्गप्रेमी, छायाचित्रकार.

या वर्षी पाऊस लवकर सुरू झाला आहे. ऊन व पाऊस योग्य प्रमाणात मिळत असल्याने यावर्षी फुलोरा लवकर येत आहे. चांगल्या हवामानाचा हा परिणाम आहे. उत्तम सूर्यप्रकाश व पाऊस असे समीकरण जुळून आल्याने फुलझाडांचा बहर दिसत आहे.
-राम मुंढे,
वन अभ्यासक.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!