विठ्ठल ममताबादे
उरण, १८ जुलै : जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय, शेवा येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने रुस्तमजी केरावाला फाउंडेशनच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. ११ ऑगस्टपासून माध्यमिक इमारतीच्या गेटसमोर शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा कर्मचाऱ्यांनी केली आहे.
शाळेतील १०१ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, वार्षिक वेतनवाढ व सात वर्षांपासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता देण्यात येत नसल्यामुळे असंतोषाच्या भूमिकेत आहेत. संस्थेने २०१९ पासून वेतनवाढ थांबवली असून शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थकीत रक्कम जमा करावी, अशी मुख्य मागणी आहे. संघटनांनी राज्य शासनास व संबंधित संस्थेस अनेकदा निवेदने दिली, मात्र कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासन जबाबदार – आंदोलनकर्त्यांचा इशारा
आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी शिक्षण संस्था व महाराष्ट्र शासनाची असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. सात वर्षांच्या प्रलंबित वेतन व भत्त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली असून मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
२,४०० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
सदर विद्यालयात इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळेत केजी ते १०वीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. संस्थेच्या कारभारामुळे शैक्षणिक वातावरण बिघडत असून विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या चिंतेत आहे. या आंदोलनावर तत्काळ तोडगा न निघाल्यास २,४०० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली आहे.
