घन: श्याम कडू
उरण : करंजा परिसरातील द्रोणागिरी मंदिर हे श्रद्धा, संयम आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं. मात्र अलीकडच्या काळात काही विघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींनी या पवित्र स्थळाला नशेच्या विळख्यात ओढण्याचा धाडस केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मंदिराच्या सभामंडपात आणि पाण्याच्या टाकीच्या मागच्या बाजूस गांजाचे सेवन करत असल्याचं स्पष्टपणे निदर्शनास आल्याने मंदिर समिती आणि ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त करत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
गांजाचं सेवन फक्त कायद्याच्या विरोधात नाही, तर भक्तांच्या भावना आणि द्रोणागिरीच्या आध्यात्मिक पवित्रतेवर थेट घाव आहे. या घटनांमुळे परिसराची प्रतिष्ठा आणि शिस्त धोक्यात आली आहे. मंदिर समितीने आणि करंजा ग्रामस्थ मंडळाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, नशेबाजांवर पोलीस कारवाई करण्याचे ठोस संकेत दिले आहेत.
ग्रामस्थांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की कोणतीही व्यक्ती मंदिर परिसरात गांजाचे सेवन अथवा धूम्रपान करताना आढळल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल आणि कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही. मंदिर हे भक्तांच्या श्रद्धेचं स्थान असून, ते नशेबाजांच्या बेशरम विकृतीसाठी खुलं ठेवण्यात येणार नाही.
मंदिर परिसराची शिस्त आणि पवित्रता राखण्यासाठी सर्व नागरिकांनी सजग राहावं, अशी विनंती समितीने केली आहे. या बाबतीत ग्रामस्थांनी आता नशेबाजांना ‘थेट हातात घेण्याची’ तयारी दर्शवली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तसे प्रकार आढळल्यास तत्काळ सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा, जशास तसे उत्तर देण्याची वेळ आल्यास परिणाम कोणालाही चुकणार नाही, असे ग्रामस्थांचे ठाम मत आहे.