• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले; ७ एप्रिलला प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार

ByEditor

Feb 18, 2026

मे अखेरीस निवडणुका होण्याची शक्यता; महसूल यंत्रणा कामाला लागली

​मुंबई | मिलिंद माने

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार येत्या २० फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, ७ एप्रिल २०२६ रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

​ग्रामविकास विभागाने हा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग रचनेची ही संपूर्ण प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार असून, याची जबाबदारी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी (प्रांत) आणि जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

​असा असेल प्रभाग रचनेचा कार्यक्रम:

​निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, प्रभाग रचनेचे टप्पे खालीलप्रमाणे असतील:

​२० फेब्रुवारी २०२६: ‘गुगल अर्थ’च्या मदतीने गावांचे नकाशे अंतिम करणे (तहसीलदार स्तरावर).

​२७ फेब्रुवारी २०२६: तलाठी व ग्रामसेवकांमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून प्रभाग निश्चिती.

​२३ मार्च २०२६: जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर राज्य निवडणूक आयोगाकडून प्रस्तावास मान्यता.

​७ एप्रिल २०२६: प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागवणे.

​१३ एप्रिल २०२६: हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत.

​२१ एप्रिल २०२६: प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी.

​२८ एप्रिल २०२६: जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रभाग रचनेला अंतिम मान्यता.

​४ मे २०२६: अंतिम प्रभाग रचनेची अधिकृत प्रसिद्धी.

​शिक्षकांच्या सुट्ट्यांवर टांगती तलवार?

​प्रभाग रचनेचा हा वेगवान कार्यक्रम पाहता, मे महिन्याच्या अखेरीस ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान पार पडण्याची दाट शक्यता आहे. जर निवडणुका मे महिन्यात झाल्या, तर निवडणूक कर्तव्यासाठी शिक्षकांची उन्हाळी सुट्टी रद्द करून त्यांना कामावर नियुक्त केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

​या संदर्भातील अधिकृत आदेश ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी निर्गमित केले असून, प्रशासकीय यंत्रणेला युद्धपातळीवर तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!