शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल -शंकरराव म्हसकर
विश्वास निकम
कोलाड : रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांत इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर करण्याच्या केंद्र शासनाच्या मसुद्याला शेतकरी कामगार पक्षाने कडाडून विरोध केला आहे. रोहा तालुक्यातील ११९ गावांना या झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले असून, त्यामुळे शेतकऱ्यांवर अनेक निर्बंध लादले जातील, असा आरोप करत शेकापच्या वतीने रोहा तहसीलदार, प्रांताधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांनी स्पष्ट इशारा दिला की, वेळ पडल्यास पक्ष शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.
यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, तालुका चिटणीस शिवराम महाबळे, आरडीसीसी बँक संचालक गणेश मढवी, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, मारुती खांडेकर, गोपीनाथ गंभे, खेळू ढमाल, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष संतोष दिवकर, विनायक धामणे, तुकाराम खांडेकर, प्रफुल घावटे, विचारे, राजू तेलंगे, दीपक दाईलकर आदी तालुक्यातील शेकापचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाने जारी केलेल्या मसुदा अधिसुचनेनुसार रायगड जिल्ह्यातील एकूण ४३७ गावे ‘इको सेन्सेटिव्ह झोन’मध्ये घोषित करण्यात आली आहेत. त्यातील रोहा तालुक्यातील ११९ गावांवर हे निर्बंध लागू होणार आहेत. संबंधित विभागांनी अधिसुचनेचा मसुदा जारी केल्यानंतर ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. मसुदा लागू झाल्यास शेतीपुरक व्यवसाय, जमीन विकास, आणि वैयक्तिक मालकीतील उपक्रमांवर निर्बंध येतील.
निवेदनात म्हटले आहे की, या झोनमुळे शेतकऱ्यांना कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, विट व्यवसाय, भाजीपाला उत्पादन, मत्स्यशेती आणि शेतघरे बांधणे अशक्य होईल. रोहा तालुका हा भात उत्पादनात अग्रगण्य असून त्याचा पोहा देशभरात जातो. येथे अनेक उद्योग आहेत जसे रिलायन्स, सुप्रिल पेट्रोकेमिकल, जिंदल ड्रिलिंग इत्यादी. औद्योगिक विकासाच्या नकाशात असूनही इको झोनमुळे शेतकऱ्यांचा आणि स्थानिक विकासाचा गळा घोटला जाईल, असा आक्षेप शेकापने घेतला आहे.
शेकाप नेते शंकरराव म्हसकर यांनी निवेदनाद्वारे सांगितले की, केंद्र आणि राज्य शासनाने इको सेन्सेटिव्ह झोनच्या निर्बंधांवर पुनर्विचार करावा, अन्यथा शेकाप रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. पक्षाचे अध्यक्ष जयंता पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन तीव्र रूप धारण करेल.
१५ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरल्यामुळे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी आणि भरपाई देण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही शेकापने संबंधित प्रशासनाकडे केली आहे.