दिघोडेच्या विद्यार्थ्यांची शासनाला हाक
उरण, दि. १७ (अनंत नारंगीकर) — रायगड जिल्ह्यातील दिघोडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची जीर्ण व धोकादायक इमारत सध्या विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरली आहे. सुमारे ६० वर्षांची ही इमारत कोसळण्याच्या स्थितीत असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. पावसाळ्यात गळक्या कौलारू छपरांमुळे वर्गखोल्यांमध्ये पाणी झिरपत असून शिक्षण घेणाऱ्या ११७ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सवाल उपस्थित केला जात आहे.

दिघोडे गावाला ऐतिहासिक स्वातंत्र्यलढ्याचा वारसा लाभलेला आहे. १९३० च्या चिरनेर जंगल सत्याग्रहात गावातील स्वातंत्र्य सैनिक आलू बेमट्या म्हात्रे यांनी वीरमरण प्राप्त केले होते. या ऐतिहासिक भूमीत ग्रामस्थांनी शासनाच्या देखरेखीखाली शाळेची इमारत उभारली होती, जिथून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी समाजहिताची कामे करत उच्च पदांवर पोहोचले. आज तीच शाळा जीर्णावस्थेत असून वर्गखोल्यांची दुरवस्था व विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कोसळण्याचा धोका पालकांना चिंताग्रस्त करत आहे.

ग्रामस्थ व पालक वर्गाकडून राज्य शासन तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे नव्या इमारतीसाठी तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
शाळेतील परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन शासनाने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे, असा एकच सूर गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत ही मोडकळीस आली आहे. दुर्घटना घडली तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. तसेच नवी इमारत बांधण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु सुसज्ज इमारतीच्या बांधकामासाठी निधी मंजूर होत नाही. तरी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची आमची मागणी आहे.
-किर्तीनिधी ठाकूर
सरपंच, दिघोडे ग्रामपंचायत.