अमूलकुमार जैन
अलिबाग : मुरुड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना महिन्याला दहा हजार रुपये व्याज मिळेल, अशा आमिषाने गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रसन्न पुळेकरला मुरुड पोलिसांनी अटक केली आहे. कमीत कमी एक लाख रुपये गुंतविल्यास दर महिन्याला दहा हजार रुपये व्याज मिळेल, असे सांगून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. मुख्य तक्रारदार महेश भगत यांच्यासह १३६ नागरिकांनी मुरुड पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.
या तक्रारीनुसार सुमारे आठ कोटी एक लाख पंचवीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, प्रसन्न पुळेकरचा शोध घेण्यासाठी मुरुड पोलिस सक्रिय होते. अखेर तो मुरुड दिवाणी न्यायालयात एका केससाठी उपस्थित राहिला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून चौकशी करून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला.
प्रसन्न पुळेकरविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासाचा भंग), तसेच अनियंत्रित योजनांवर बंदी कायदा २०१९ अंतर्गत कलम ३, ४, ५, २१, २२, २३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरुडमधील अनेक नागरिकांनी अधिक व्याज मिळण्याच्या आशेने मोठ्या रकमेची गुंतवणूक केली होती, मात्र पैसे न मिळाल्याने फसवणुकीची जाणीव होऊन सर्वांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली आणि जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड यांच्याकडे तक्रार नोंदवली.
मुरुड पोलिसांनी पुळेकरला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास २४ जुलै २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.