अमूलकुमार जैन
रायगड, ता. १७ : कर्जत तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन सतरा वर्षीय अल्पवयीन मुलांनी जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. या प्रकाराचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याने पीडितेच्या मानसिक स्थितीत गंभीर परिणाम झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अल्पवयीन आरोपी याने पीडित अल्पवयीन ही गावातीलच असल्याने त्याने त्या मुलीबरोबर इन्स्टाग्राम या सोशल मिडीया अकाउंटवरून परिचय करून घेतला. तद्नंतर तिच्याबरोबर मैत्रीचे संबंध निर्माण केले. झालेल्या मैत्रीच्या संबंधातून अल्पवयीन आरोपी याने पीडित अल्पवयीन मुलीबरोबर जबरदस्तीने शरीर संबध ठेवुन या प्रकारचे व्हिडीयो तयार केले असल्याची धमकी देत परत शरीर संबंध प्रस्थापित केले. त्याचप्रमाणे दुसरा अल्पवयीन आरोपी याने देखील इन्स्टाग्राम अकाउंटचा वापर करीत अल्पवयीन पीडित मुलीस भेटण्यासाठी बोलवले. सदर पीडित मुलगी ही त्यास भेटण्यास गेली असता दुसरा अल्पवयीन आरोपी याने पीडितेला पहिला अल्पवयीन आरोपी याचेकडे व्हिडीओ असुन ते सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवुन तिचे बरोबर जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले. सदर घटना ही दिनांक १ जून २०२५ ते ५ जून २०२५ दरम्यान घडली आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केल्यानंतर दोन्ही अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधारगृह येथे करण्यात आली आहे.
याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुरनं.११४/२०२५ बाल लै. अत्या. संरक्षण अधिनियम, २०१२ चे कलम 4,6, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(२)(एम)(आय),६५(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे करीत आहेत.
ही घटना किशोरवयीन मुलांमध्ये सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गुन्हेगारी मानसिकतेचे गंभीर उदाहरण असून, पालक, शिक्षक आणि प्रशासन यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.