उरण, दि.१६ (विठ्ठल ममताबादे) — उलवे नोडमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून रहिवाशांना दररोज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन राजे येरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत बाकळकर, गजानन जाधव, साई पैकडे, शशिकांत कांबळे आदी कार्यकर्त्यांनी सिडकोच्या ऍडिशनल चीफ इंजिनिअर पी.एस. फुलारी यांची सिडको भवन, बेलापूर येथे भेट घेतली आणि पाणी प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करणारे निवेदन त्यांना सुपूर्त केले.
उलवे नोडमधील सेक्टर ८, ९, १० मधील मोठ्या टॉवरना अधिक प्रमाणात पाणी मिळत असल्याने छोट्या सोसायट्यांना पाणी मिळत नाही. विशेषतः सेक्टर ९ मधील भूखंड क्रमांक ४९ ते ५५ येथील सोसायट्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद आहे. शासनातर्फे देण्यात येणारा टँकरही नियमित येत नाही आणि पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. तसेच सेक्टर १७ मधील भूखंड क्रमांक २६० ते ३९७ आणि जावळे गाव टेकडीवर असल्यामुळे तिथेही पाणी पोहोचत नाही. सेक्टर १५, १६, १७ मध्ये पाईपलाईन फिरून गेल्यामुळे अनेक छोट्या सोसायट्यांपर्यंत पाणी पोहचत नाही. बामणडोंगरी रेल्वे स्थानकासमोरील इमारतीतही पाणीटंचाई आहे.
उलवे नोडमध्ये मास्टर बॅलेंसिंग टँक (एमबीआर) उपलब्ध नसल्यामुळे पाणीपुरवठा सतत कमी दाबाने होत असून उंच इमारतींमध्ये पंपशिवाय पाणी पोहचत नाही. देखभाल कामादरम्यान धरणाच्या बाजूने पाणी बंद पडल्यास संपूर्ण पुरवठा थांबतो. अल्प कालावधीसाठी पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे आवश्यकतेपेक्षा कमी पाणी मिळते.
नजीकच्या काळात उलवे नोडमध्ये जलद गतीने बांधकामे सुरू असून लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे सिडकोने तातडीने जलनियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. या समस्यांचे निराकरण होईपर्यंत उलवेमध्ये कोणत्याही नवीन बांधकामासाठी सीसी (कन्स्ट्रक्शन क्लिअरन्स) देऊ नये, अशी स्पष्ट मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.