म्हसळा | वैभव कळस
खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा तालुका शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, या निधीच्या जोरावर शहराच्या विकासकामांना मोठा वेग प्राप्त झाला होता. यामुळे नागरिकांमध्ये विकासाबाबत सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने हिंगुलकरणी देवी पर्यटन स्थळ विकास, राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारणी, म्हसळा नगर पंचायत शासकीय इमारत, म्हसळा पोलीस ठाण्याची नवीन शासकीय इमारत, तसेच पाणीपुरवठा योजना आणि डंपिंग ग्राउंड उभारणी यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.

या सर्व महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन पार पडून प्रत्यक्ष कामांना सुरुवातही झाली होती. प्रामुख्याने पाणीपुरवठा योजना आणि डंपिंग ग्राउंडचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, नव्याने काही विकासकामे सुरू झाल्यानंतर नगर पंचायत स्तरावर अचानक निर्माण झालेल्या राजकीय स्थित्यंतरामुळे विकास प्रक्रियेला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे. काही प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांकडून आक्षेप व अडथळे निर्माण झाल्याची चर्चा देखील सध्या सुरू आहे. परिणामी, प्रत्यक्ष कामांचा वेग मंदावल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे.
दरम्यान, राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या निधनाच्या दु:खद पार्श्वभूमीवर राजकीय व प्रशासकीय स्तरावर काही काळ स्थिरता निर्माण झाल्यानेही विकासकामांच्या गतीवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. जनतेला अपेक्षित असलेली आणि लोकप्रतिनिधींनी वचनबद्ध केलेली ही विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी सर्वसामान्य नागरिकांची रास्त अपेक्षा आहे. सत्ताधारी पक्ष आणि स्थानिक नेतृत्व विकासासाठी प्रयत्नशील असतानाच या कामांत नेमके अडथळे का निर्माण होत आहेत, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पांना पुन्हा गती मिळून शहराचा सर्वांगीण विकास मार्गी लागणार का, याकडे आता संपूर्ण म्हसळा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
