• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पुण्यस्मरणातून सेवा: खोलमकर कुटुंबीयांकडून गोदानाच्या माध्यमातून समाजहिताची प्रेरणा

ByEditor

Jul 16, 2025

अलिबाग : कै. विनायक गणपत खोलमकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक उदात्त आणि समाजहिताचा उपक्रम राबवण्यात आला. सौ. रत्नप्रभा बेल्हेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी श्री केशव गोधन समृद्धी केंद्र यांना दोन दुभत्या गाईंकरिता ₹1,20,000 चा धनादेश सुपूर्त केला. हा निधी श्रीम. उज्ज्वला चंदनशिवे अध्यक्ष असलेल्या ‘उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था’कडे देण्यात आला असून समाजात गोदानासारख्या पुण्यकार्याची प्रेरणा देणारा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.

उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व श्री केशव गोधन समृद्धी केंद्र यांच्यामार्फत वसुबारसपर्यंत शंभर गरजू शेतकऱ्यांना शंभर दुभत्या गाईं देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या गावातच रोजगार आणि उत्पन्नाची संधी मिळणार आहे, व शहराकडे जाण्याची गरज कमी होईल. अशा प्रकारे ग्रामविकास आणि स्वयंपूर्णता यांना चालना देणारे हे कार्य सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.

या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. राजाराम हुलवान (अध्यक्ष, माणुसकी प्रतिष्ठान) यांनी समाजातील सधन व्यक्तींनी गोदान करून आध्यात्मिक उन्नतीसोबतच गरजूंना आर्थिक हातभार लावण्याचे आवाहन केले. तसेच डॉ. नितीन गांधी यांनी शहरातील नागरिकांनी अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमात सहभाग घ्यावा, ज्यायोगे ग्रामीण भागाला रोजगार, दूध पुरवठा आणि समृद्धीकडे वाटचाल करण्याची संधी मिळेल, असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी रत्नप्रभा बेल्हेकर, अनिलकुमार बेल्हेकर यांनी आपल्या वडील कै. विनायक गणपत खोलमकर यांच्या पुण्यस्मरणासाठी गोदानाचे हे स्तुत्य कार्य केले. आई लता देवी खोलमकर, गायत्री बेल्हेकर, शुभम सहाय, नेहा बेल्हेकर, शिवम प्रतापसिंग आणि रितुराज अनिलकुमार बेल्हेकर यांचा या उपक्रमात मोलाचा सहभाग होता. हे कार्य केवळ श्रद्धांजली नव्हे, तर ग्रामसमाजासाठी आशेचं किरण ठरले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!