• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महेंद्र पाटील यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, चौकशीची जोरदार मागणी

ByEditor

Jul 18, 2025

घनःश्याम कडू
उरण, ता. १८ जुलै :
उरण तालुक्यात रानसई येथे बुधवारी (दि.१६) विजेच्या पोलवर दुरुस्तीचे काम करताना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्यामुळे चिरनेर येथील महेंद्र (मयूर) रामचंद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महावितरण व्यवस्थेच्या सुरक्षेवर तीव्र टीका होत आहे.

महेंद्र पाटील हे मागील ३० वर्षांपासून कंत्राटी वायरमन म्हणून महावितरणसाठी कार्यरत होते. त्यांच्या समर्पित सेवेमुळे रात्री-अपरात्री, पावसात आणि वादळातही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ते धाव घेत असत. मात्र, इतक्या वर्षांच्या सेवेनंतरही त्यांचा दर्जा ‘कंत्राटी’च राहिला आणि अखेर वीजेच्या धक्क्याने त्यांचे जीवनच संपले.

बेपर्वाई की चुकीचा निर्णय? — सरकारी अनुपस्थितीवर संताप

दुर्घटनेच्या वेळी काही अधिकारी घटनास्थळी उपस्थित असूनही पोलवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराला सुरक्षितता न पुरवता वीजपुरवठा सुरु ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. स्थानिक नागरिकांनी ही गोष्ट ‘खून सदृष्य’ बेपर्वाई ठरवत, संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हजारो ग्रामस्थांची उपस्थिती, शासकीय प्रतिनिधी मात्र गायब

अंत्यसंस्कारावेळी हजारो ग्रामस्थ उपस्थित होते, परंतु महावितरणचे प्रतिनिधी आणि अधिकारी अनुपस्थित होते, यावरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

कुटुंबाला न्यायाची अपेक्षा — आंदोलनाचा इशारा

मृत पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि वडील असा परिवार उरला आहे. त्यांना तात्काळ आर्थिक मदत, कुटुंबातील सदस्याला नोकरी आणि महावितरणकडून न्याय मिळावा, अशी ठाम मागणी आहे. याप्रकरणात उच्चस्तरीय चौकशी न झाल्यास उरण तालुक्यातील कंत्राटी कामगार एकवटून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!