विश्वास निकम
कोलाड, ता. १८ जुलै : मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरून कोलाड हायस्कूलकडे जाणारा उपमार्ग गेल्या दोन-तीन वर्षांपासून खड्ड्यांनी भरलेला असून ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?’ असा संभ्रम निर्माण होतो आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे मार्ग आणखी धोकादायक बनला असून विद्यार्थी, शिक्षक, कामगार आणि रहिवासी यांच्यासाठी ही अवस्था जीवघेणी ठरत आहे.
या रस्त्यावर प्राथमिक मराठी केंद्र शाळा, द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असून शैक्षणिक वस्ती तसेच धाटाव एम.आय.डी.सी.मध्ये काम करणारे अनेक कामगार दररोज याच मार्गाने ये-जा करतात. रस्ता अरुंद असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करत गंतव्यस्थानी पोहोचावे लागते.
पावसामुळे खड्डे अदृश्य, अपघातांचे प्रमाण वाढले
अलीकडेच एका टुव्हीलरवरून धाटाव एम.आय.डी.सी.कडे जाणाऱ्या कामगाराचा वाहन खड्ड्यांमध्ये स्लीप झाल्याने अपघात झाला, मात्र सुदैवाने तो बचावला. रस्त्याची ही अवस्था पाहता शासनाचे “गाव तेथे चांगला रस्ता” हे ब्रीदवाक्य केवळ कागदावरच राहिले असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सार्वजनिक सुरक्षा धोक्यात — प्रशासन गप्प
दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, “एखाद्याचा नाहक बळी गेल्यानंतरच रस्त्याचे काम पूर्ण होणार का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी पालकांनी शासन व स्थानिक प्रशासनाकडे तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.