अमूलकुमार जैन
रायगड : कोकण रेल्वे तसेच हार्बर मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानकावर नारकोटिक्स नियंत्रण विभाग (एनसीबी) व रेल्वे पोलीस दलाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत तब्बल ३.५ किलो कोकेन जप्त करण्यात आले असून, एक नायजेरियन महिला अटकेत आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य अंदाजे ३५ कोटी रुपये असून, ही कारवाई अंमली पदार्थ तस्करीविरोधातील मोठा धक्का मानली जात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, मंगला एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२६१८) मधून अंमली पदार्थांची वाहतूक होत असल्याचे एनसीबीच्या बंगळूर युनिटने उघड केले. या माहितीची तत्काळ पनवेल रेल्वे पोलीस विभागाला कल्पना देण्यात आली. गाडी फलाट क्रमांक ७ वर पोहोचताच शोधमोहीम राबवण्यात आली. कोच ए-२ मधील आसन क्रमांक २७ वर एक नायजेरियन महिला लहान बाळासह प्रवास करताना सापडली.
सदर महिलेने आपले नाव एटुमुदोन डोरिस सांगितले असून, तिच्याकडे नायजेरियन पारपत्र आढळले. तिच्याकडे असलेल्या रंगबिरंगी बॅगेची तपासणी करताना ‘व्हिंटेज’ लेबल असलेल्या रबरमध्ये गुंडाळलेली दोन काळ्या रंगाची पॅकेजेस सापडली. ड्रग डिटेक्शन किटद्वारे तपासणी केल्यावर त्यात कोकेन असल्याची पुष्टी झाली.
महिला व तिच्या सामानासह तिला आरपीएफ पोस्ट, पनवेल येथे आणून चौकशी करण्यात आली. तिला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली असून, पुढील तपास एनसीबी व रेल्वे सुरक्षा दल करत आहेत.