बांधकामाचा पडदा अडकला निधीत; वाढीव निधीची नाट्यगृहाला गरज
▪︎ केवळ ५०% काम पूर्ण, बाल्कनी काम अंतिम टप्प्यात
▪︎ साहित्याचे दर वाढल्याने मंजूर निधी अपुरा
▪︎ सांस्कृतिक जडणघडीत मोलाची भर देणारे प्रकल्प ठप्प अवस्थेत
▪︎ प्रेक्षक क्षमता कमी असल्याने दर्जेदार नाटकांचे आयोजन कठीण
सलीम शेख
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव हे दक्षिण रायगडमधील एक महत्वाचे आणि झपाट्याने विकसित होणारे ठिकाण आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक चळवळींसाठी ओळखले जाणाऱ्या या ठिकाणी आठ वर्षांपूर्वी मंजूर झालेले नाट्यगृह आजही अपूर्ण अवस्थेत आहे. या दिरंगाईमुळे नाट्यप्रेमींमध्ये संताप असून, “हे नाट्यगृह कधी पूर्ण होणार?” असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे.
कामाला गती नाही, निधी अपुरा!
माणगाव नगरपंचायत हद्दीतील शासकीय विश्रामगृहासमोर उभारण्यात येणाऱ्या या नाट्यगृहाचे काम आठ वर्षांपूर्वी सुरू झाले. संस्कृती कार्य विभागाच्या निधीतून हे नाट्यगृह मंजूर झाले असले तरी, मंजूर निधी अपुरा पडत असल्यामुळे काम रखडले आहे. सध्या केवळ ५०% काम पूर्ण झाले असून, बाल्कनीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, साहित्य दर व मजुरीत झालेली मोठी वाढ लक्षात घेता उर्वरित कामासाठी वाढीव निधीची तातडीने आवश्यकता आहे.
आसन क्षमता ठरत आहे अडचणीची
सद्यस्थितीत या नाट्यगृहात सुमारे ५०० प्रेक्षकांची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, ही क्षमता आयोजकांना आर्थिकदृष्ट्या तोट्याची ठरत आहे. प्रसिद्ध व व्यावसायिक नाटके सादर करण्यासाठी अधिक प्रेक्षकसंख्या आवश्यक असते. कमी आसन क्षमतेमुळे तिकीट दर वाढवावे लागतील, परिणामी प्रेक्षकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या नाट्यगृहाची आसन क्षमता ७०० ते १००० पर्यंत वाढवली गेल्यास अधिक दर्जेदार कार्यक्रम व नाटके आयोजित करणे शक्य होईल. यामुळे माणगाव हे दक्षिण रायगडमधील एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून नावारूपाला येऊ शकेल.
दक्षिण रायगडची सांस्कृतिक चळवळ थांबतेय?
पनवेल, रोहा, महाड यांसारख्या ठिकाणी आधीच कार्यरत नाट्यगृहे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही खेड, चिपळूण येथे नाट्यगृहे कार्यरत आहेत. मात्र माणगावसारख्या मध्यवर्ती आणि सांस्कृतिकदृष्ट्या सक्रीय ठिकाणी अपूर्ण नाट्यगृह ही दुर्दैवी बाब आहे. नाट्यगृहाच्या अपूर्णतेमुळे या भागातील कलाकार, नाट्यसंस्था आणि रसिक प्रेक्षकांनाही मोठ्या प्रमाणावर संधी गमवावी लागत आहे.
वाढीव निधी मिळाल्यास नाट्यगृह लवकर पूर्ण होणार!
स्थानिक नागरिक, सांस्कृतिक कार्यकर्ते आणि नाट्यप्रेमी यांची शासनाकडे मागणी आहे की, या नाट्यगृहाच्या बांधकामाचे पुनर्मूल्यांकन करून वाढीव निधी तातडीने मंजूर करावा. योग्य निधी मिळाल्यास उशिरा का होईना, पण हे नाट्यगृह प्रशस्त, सर्व सोयीयुक्त स्वरूपात पूर्ण होईल आणि माणगावच्या सांस्कृतिक जडणघडीत मोलाची भर टाकेल, अशी आशा नागरिकांतून व्यक्त होत आहे.