• Fri. Feb 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड: दहिवाड परिसरात रिक्षा उलटून भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, तीन प्रवासी जखमी

ByEditor

Feb 13, 2026

महाड | प्रतिनिधी
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहिवाड परिसरात एका भरधाव रिक्षाचा भीषण अपघात झाला. रिक्षा उलटल्याने झालेल्या या दुर्घटनेत साकडी-कुसगाव येथील २५ वर्षीय तरुण रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षातील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजित सुधीर सकपाळ (वय २५, रा. साकडी-कुसगाव) हा आपली रिक्षा घेऊन कर्ण रिसॉर्ट परिसरातून दहिवाड गावाच्या दिशेने जात होता. यावेळी रिक्षेचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याने, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, रिक्षा रस्त्यावरच पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये सुजितचा जागीच अंत झाला.

या अपघातात रिक्षेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यातील तीन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनिकेत शशिकांत धयाळकर (२४), रोहिणी हिरामण धयाळकर, अंतरा शशिकांत धयाळकर (सर्व रा. नांदगाव, ता. महाड) यांचा समावेश आहे.

सुदैवाने या तिघांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत सुजितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अतिवेगामुळेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, याप्रकरणी पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!