विनायक पाटील
पेण : शहरात अनेक वर्षांपासून नागरिकांवर सावकारीचा जाच लादणाऱ्या सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील व त्याचा मुलगा भरत पाटील यांच्या विरोधात अखेर कडक कारवाई झाली आहे. या दोघांवर सावकारी अधिनियम २०१४ चे कलम २३, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ४६, ४८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सावकारी व्यवहाराशी संबंधित दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB), अलिबाग आणि सहाय्यक निबंधक, पेण यांच्या संयुक्त पथकाने केली.
तक्रारीमुळे तपासाची चक्रे सुरू
पेणमधील दोन तरुणांनी सावकारकीच्या जाचाला कंटाळून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, काही रक्कम कर्ज स्वरूपात देऊन त्यावर अवाजवी व्याज आकारले जात होते, आणि नंतर धमकावून वसुली केली जात होती. तक्रारीच्या आधारे पोलीस अधीक्षक दलाल यांनी संयुक्त पथक तयार करून तपासाचे आदेश दिले.
तीन ठिकाणी छापेमारी – मोठा दस्तऐवज सापडला
शुक्रवार, १९ जुलै रोजी या पथकाने पेण शहरातील चिंचपाडा येथील आमंत्रण बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक ३०१ व ३०२, हॉटेल रायगड गोमांतक, तसेच कार्यालयात एकाचवेळी छापेमारी केली.
या छापेमारीदरम्यान, सावकारी व्यवहाराशी संबंधित अनेक महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले, ज्यामध्ये:
- कोरे व भरलेले चेक
- बँकांचे पासबुक
- कर्जखत व प्रॉमिसरी नोटबुक
- स्टॅम्प पेपर व वचनचिठ्ठ्या
- साठे करार व खरेदीखत
- सावकारी पावती बुक व मालमत्तांचे करारनामे
- गाव नकाशा आदींचा समावेश आहे.
सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल
या छापेमारीनंतर सहाय्यक निबंधक पेण, निलेश काळे यांनी सोमवार, २१ जुलै रोजी उशिरा पेण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात गु. र. नं. १३४/२०२५ अन्वये भारतीय सावकारी अधिनियम २०१४ मधील कलम २३, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ४६ व ४८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
परवाना असूनही अटींचा भंग, कार्यक्षेत्राबाहेरही सावकारी
सुरेश पाटील व भरत पाटील यांना सन २०२२-२३ मध्ये पेण तालुक्यात सावकारी व्यवसाय करण्यासाठी अधिकृत परवाना प्राप्त झाला होता. मात्र, या दोघांनी परवान्यात नमूद केलेल्या अटींचा भंग करून कार्यक्षेत्राच्या बाहेरही सावकारी व्यवहार चालवले. त्यांनी परवान्याच्या अटींप्रमाणे व्याजदर न पाळता, अवाजवी व्याज आकारून अनेक सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली, असा ठपका ठेवण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरू; आणखी तक्रारींची शक्यता
या प्रकरणाचा तपास पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासादरम्यान आणखी अनेक लोक पुढे येण्याची शक्यता असून, हजारो-लाखोंच्या सावकारी व्यवहारांचे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या विशेष निरीक्षणाखाली ही कारवाई झाल्यामुळे, जिल्ह्यातील इतर बेकायदेशीर सावकारांमध्येही खळबळ उडाली आहे. पेणमधील नागरिकांमध्ये या कारवाईमुळे समाधानाचे वातावरण असून, सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्या अनेकांना आता न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. प्रशासनाने पुढील काळात अशा प्रकारांच्या विरोधात अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.