• Wed. Jul 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पनवेल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लाच घेताना अडकले; खाजगी साथीदारासह एसीबीच्या जाळ्यात

ByEditor

Jul 22, 2025

अमूलकुमार जैन
रायगड :
पनवेल शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन वामनराव वायकर (वय ४२) आणि त्यांचा खाजगी साथीदार रविंद्र उर्फ सचिन सुभाष बुट्टे (वय ३०, व्यवसाय कॅमेरा मेकॅनिक, रा. करंजाडे, पनवेल) यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.

ही कारवाई २१ जुलै २०२५ रोजी रात्री साडेअकरा वाजता जुना पनवेलमधील शिवाजी चौक येथील ‘श्री मारुती कुशन’ या इमारतीजवळ करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक वायकर यांनी एका तक्रारदाराकडून त्याच्या वडिलांविरोधात सुरू असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर रक्कम पन्नास हजारांवर आली. ही रक्कम त्याने खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून स्वीकारली, त्याच वेळी ACB टीमने त्याला पकडले.

या प्रकरणात तक्रारदाराच्या वडिलांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन वायकर करीत होते. तपासादरम्यान, वायकर यांनी तक्रारदाराला धमकी दिली की, “तुझ्या वडिलांच्या गुन्ह्यात अधिक कडक कलमे वाढवून त्यांचा अंतरिम जामीन नामंजूर करून त्यांना अटक केली जाईल. जर हे टाळायचे असेल, तर एक लाख रुपये लाच द्यावी लागेल.”

तक्रारदाराने सदर प्रकरणाची तक्रार दिनांक २१ जुलै २०२५ रोजी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. ACB ने प्राथमिक पडताळणी केली असता, लाच मागणीचा प्रकार खरा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्या दिवशीच रात्री सापळा रचण्यात आला.

ACB च्या अधिकाऱ्यांनी ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच जुना पनवेलमधील शिवाजी चौकाजवळ, श्री मारुती कुशन इमारतीच्या परिसरात सापळा लावला. तक्रारदाराने पन्नास हजार रुपयांची रक्कम पोलीस उपनिरीक्षक वायकर यांच्या वॅगन-आर कारमध्ये त्यांचे खाजगी साथीदार रविंद्र उर्फ सचिन बुट्टे याच्यामार्फत दिली. रक्कम स्वीकारताच दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले.

या कारवाईनंतर उपनिरीक्षक वायकर व त्यांचा साथीदार यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे.

दरम्यान, पोलीस उप अधीक्षक सरिता भोसले (ACB, रायगड) यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कामासाठी कोणताही अधिकारी किंवा खाजगी इसम (एजंट) जर कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असेल, तर त्याविरोधात तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

📞 ACB रायगड कार्यालय दुरध्वनी – ०२१४१-२२२३३१
📞 टोल फ्री क्रमांक – १०६४

या घटनेमुळे पोलीस खात्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासकीय अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या भ्रष्ट वर्तनाला आवर घालण्यासाठी ACB ची कारवाई महत्त्वाची ठरत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!