विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील नम्रता ढाबा ते गारभट मार्ग आज झाडाझुडपांनी इतका व्यापलेला आहे की रस्ताच हरवल्यासारखा वाटतो. या रस्त्यावरून दररोज शालेय विद्यार्थी, प्रवासी नागरिक, दूध विक्रेते, बाजारात ये-जा करणारे ग्रामस्थ आणि धाटाव एमआयडीसीमधील कामगार यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडी वाढल्याने त्यांचा प्रवास धोकादायक झाला आहे.

या मार्गावर पुगांव, मढाली, डोळवहाल, ऐनवहाल, रेवेचीवाडी, गारभट, विठ्ठलवाडी, राजखलाटी, बल्हे, कांदला ही गावे येतात. झाडाझुडपांमुळे रस्त्यावर वळणावरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघातांची शक्यता प्रचंड वाढली आहे. शिवाय, या रस्त्याचे वळणे अरुंद आणि टोकदार असल्याने वाहनचालकांसमोर संकट उभे ठाकते.
सध्या पावसाळा जोरात असल्याने रस्ता अधिकच निसरडा झाला आहे. याच मार्गावर असणाऱ्या धबधब्यांमुळे अनेक पर्यटक मौजमजा व पर्यटनासाठी येथे येत आहेत. परंतु, रस्त्याच्या खराब परिस्थितीची कल्पना नसल्याने नवीन पर्यटक अपघाताच्या अधिक धोऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
“हा रस्ता नम्रता ढाबा–गारभट–दिघेवाडी मार्गे सुधागड-पालीकडे जातो. प्रवाशांची संख्याही मोठी आहे. मात्र, रस्त्याला झाडाझुडपांनी वेढल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष घालून झाडाझुडपांची छाटणी करून रस्ता मोकळा करावा.”
-सुरेश धामणसे
सामाजिक कार्यकर्ते (डोलवहाल)
स्थानिक नागरिक व प्रवासी यांनीही प्रशासनाकडे त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे, अन्यथा एखादा गंभीर अपघात होण्याआधीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
