अमुलकुमार जैन
रायगड : खालापूर टोल नाक्यावर कंत्राटी सुरक्षारक्षकाने आयआरबी रोड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या नावाने बनावट व्हीआयपी पास तयार करून त्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खालापूर पोलिसांनी आरोपीला अटक करून २ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मिळवली आहे.
सावरोली गावातील ओंकार रामचंद्र महाडिक (रा. सावरोली, ता. खालापूर) हा युवक आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आयआरबी कंपनीत कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. नोकरीच्या दरम्यान टोल नाक्यावरून ये-जा करणाऱ्या विविध नेते, कार्यकर्ते आणि वाहनचालकांशी ओळख वाढवल्यानंतर त्याने बनावट व्हीआयपी पास तयार करून त्यांची विक्री सुरू केली.
बनावट पासच्या आधारे अनेक वाहनचालक महाराष्ट्रातील विविध टोल नाक्यांवर टोलशुल्क चुकवून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. या आर्थिक गैरव्यवहारामुळे आयआरबी कंपनीची मोठी फसवणूक झाली असून, या संदर्भात कंपनीचे अधिकारी जयवंत नारायण देसले यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
प्रारंभी खालापूर पोलिसांनी दोनदा आरोपीचा जबाब घेतला होता. मात्र कारवाईत चालढकल होत असल्याची चर्चा सुरू होती. अखेर रायगडचे नवे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, २९ जुलै रोजी ओंकार महाडिक याला राहत्या घरातून अटक करण्यात आली.
३० जुलै रोजी खालापूर न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास २ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात आणखी काही व्यक्तींनी बनावट पास खरेदी करून त्याचा फायदा घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मोठे मासे गळाला लागण्याची दाट शक्यता असून, तपासाचा फोकस आता अशा इतर लाभार्थ्यांवर केंद्रित होणार आहे.
पूर्वीही दुर्लक्ष?
स्रोतांच्या माहितीनुसार, हे प्रकरण माजी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कार्यकाळातही उजेडात आले होते. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याची चर्चा स्थानिकांत आहे.
दुसरीकडे, आंचल दलाल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवैध व अनियमित कृत्यांवर तात्काळ कारवाईचा धडाका लावल्याने त्यांना ‘लेडी सिंघम’ अशी उपाधी लावली जाऊ लागली आहे.
