क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (आरडीसीए) लवकरच स्वतःचे हक्काचे क्रिकेट मैदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने आरडीसीएच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. 29 जुलै) राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन दीर्घकालीन करारावर मैदानासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मंत्री बावनकुळे यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित कार्यवाहीसाठी रायगडचे जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले.
आरडीसीएकडे स्वतःचे मैदान नसल्यामुळे संघटनेला सराव शिबिरे व स्पर्धांसाठी खासगी क्लब्स आणि कंपन्यांच्या मैदानांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, ही मैदाने मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध होत असल्याने संघटनेला वारंवार अडचणींचा सामना करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, उपाध्यक्ष यशवंत साबळे, सदस्य शंकर दळवी, प्रदीप खलाटे, विनय पाटील आदींनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन मैदानाच्या समस्येवर चर्चा केली होती. त्यानुसार ठाकूर आणि आमदार बालदी यांनी महसूलमंत्र्यांची भेट निश्चित केली.
या बैठकीत शिष्टमंडळाने, “आरडीसीएला कायमस्वरूपी शासकीय मैदान उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना अधिक सुसज्ज आणि सातत्यपूर्ण व्यासपीठ मिळेल,” असे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) नेदेखील आरडीसीएला दीर्घकालीन करारावर जमीन मिळाल्यास निधी उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
या मागणीवर महसूलमंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेत, “जिल्हाधिकारी यांनी तात्काळ योग्य शासकीय जागेचा शोध घ्यावा आणि प्रस्ताव शासनाकडे सादर करावा,” असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील क्रिकेट संस्कृतीला बळकटी मिळण्याची आणि नवोदित खेळाडूंना आधुनिक सुविधा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
