किशोरवयीन आणि कॉलेज तरुण-तरुणींचा लॉजमध्ये वाढता वावर; पालकांमध्ये चिंता
काही लॉजमध्ये ओळखपत्राशिवाय प्रवेश; नियमांचं सर्रास उल्लंघन
विनायक पाटील
पेण, दि. ३० : पेण शहर आणि तालुक्यात लॉज संस्कृती झपाट्याने वाढत असून, अनेक लॉज अनैतिक व अवैध क्रियाकलापांचे केंद्र बनत असल्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे. पूर्वी भाविक व पर्यटकांसाठी विश्रामगृह किंवा धर्मशाळांचा वापर केला जात होता. मात्र, अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी याचेच रूपांतर व्यावसायिक लॉजमध्ये झाले असून, काही ठिकाणी या लॉजचा दुरुपयोग होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
स्थानिक सूत्रांनुसार, काही लॉज आणि फार्महाऊसवर 1500 ते 2000 रुपयांच्या मोबदल्यात बाहेरून कॉलगर्ल बोलवून “सर्व्हिसेस” पुरवल्या जातात, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे वेश्या व्यवसायाला अप्रत्यक्ष चालना मिळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, या लॉजमध्ये ओळखपत्रांची तपासणी न करता प्रवेश दिला जात असल्यामुळे किशोरवयीन आणि कॉलेज तरुण-तरुणींचाही वावर वाढला आहे.
सामाजिक माध्यमांतून तसेच स्थानिक चर्चांमध्ये, काही राजकीय कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी देखील या लॉजचा वापर करत असल्याचा आरोप केला जात आहे. ‘रिलेशनशिप’, ‘फ्रेंडशिप’ किंवा ‘स्टँडर्ड लाइफस्टाइल’च्या नावाखाली अनेक युवक-युवती लॉजमध्ये जात असून, हे पालकांच्या विश्वासाचा गैरवापर ठरत आहे, अशी चिंता अनेक पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
काही लॉजधारक आर्थिक फायद्यासाठी नियम धाब्यावर बसवत असून, त्यामुळे ब्लॅकमेलिंग, शोषण आणि अन्य गैरप्रकार घडण्याची शक्यता वाढते. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने या पार्श्वभूमीवर गंभीर लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
लॉज चालवताना ओळखपत्र तपासणी बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने, अशा लॉजचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी काही जागरूक नागरिकांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे ठरत आहे. समाजात या विषयावर जनजागृती घडवून आणल्यासच पुढील पिढी सुसंस्कृत आणि सुरक्षित बनू शकते, असा सूर सर्वत्र उमटत आहे.
