मनोज कळमकर
खालापूर : तालुक्यातील चौक पोलीस दूरक्षेत्र हद्दीत चार लाखाचा गांजा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या मनोज गौरांग प्रधान (वय 35), चंदनपुर्णा प्रधान (वय 29), दोन्ही रा. पिठानपल्ली, ता. राज्य ओडीसा आणि त्यांचा साथीदार रिक्षाचालक प्रविण प्रेमचंद गुप्ता (वय 38, रा. वाशीनाका, मुंबई) या तिघांना ताब्यात घेतले आहे.
रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी अवैध धंद्याची पाळेमुळे खोदून काढण्याचा सपाटा लावला असून गुटखा, मटका कारवाईनंतर अमली पदार्थावर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. महाड, मुरुड या ठिकाणी कारवाईनंतर खालापूर तालुक्यात अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे यांना खबऱ्यामार्फत गांजाची रिक्षातून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक बहाडकर, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई बाबासो पिंगळे, श्यामराव कराडे, ओमकार सोंडकर, अक्षय जाधव, सुदिप पहेलकर या पोलीस पथकाने चौक तीनघर नाका येथे सापळा रचला.
मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित रिक्षा पोलिसांनी अडवून तपासणी केली असता 4 लाख रुपये किंमतीचा 16 किलोग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी तिन्ही आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
