सलीम शेख
माणगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व उपनगरांतून रायगड जिल्ह्यातील गावी परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष युवानेते निलेश थोरे यांच्या पुढाकाराने यंदाही मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. माणगाव तालुक्यातील तळाशेत जिल्हा परिषद हद्दीतील मुंबईकर चाकरमान्यांसाठी या सेवेचा लाभ घेता येणार असून मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने यावर्षीही सेवा सुरू ठेवण्यात आली आहे, अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष परेश सांगले यांनी दिली.
सदर बससेवा नालासोपारा, ठाणे-खोपट, दिवा, कल्याण, डोंबिवली, मुंबई सेंट्रल, दादर, बोरिवली, घाटकोपर, पनवेल, विरार, सायन आणि मालाड या ठिकाणांहून माणगाव तालुक्यातील विविध गावांपर्यंत उपलब्ध असणार आहे. या मार्गांवरील चाकरमान्यांना गावात जाण्यासाठी कुठलाही प्रवास खर्च करावा लागणार नसून त्यांना सुरक्षित व मोफत प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
ही सेवा भुवन, रातवड, पोटनेर, निळज, वावेदिवाळी, तळाशेत, निवी, मूठवली, वारक, साले, खरवली, सुरव तर्फे तळे, बामणोली, पेण तर्फे तळे, काकळ, साई, विहुले, दाखणे या ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राजकीय स्वार्थ न ठेवता केवळ सामाजिक भान जपत युवानेते निलेश थोरे यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला असून, त्यांचा उद्देश गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांना गर्दी, तिकीट दरवाढ, वेळेचा अपव्यय व प्रवासातील त्रासापासून मुक्तता मिळावी हा आहे. या उपक्रमामुळे अनेकांना वेळ, पैसा आणि मानसिक-शारीरिक त्रासापासून सुटका होणार असून गणेशोत्सवाचा आनंद अधिक समाधानकारकपणे साजरा करता येणार आहे.