मुरुड तालुक्यातील दुर्देवी घटना; ग्रामस्थांत संताप
अमुलकुमार जैन
रायगड: गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने रायगडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक ठिकाणी भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात आज (१९ ऑगस्ट) सकाळी दरड कोसळून विठाबाई गायकर (वय ७५) यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.
सकाळी साडेआठ वाजता विठाबाई गायकर आपल्या दुकानात असताना दुकानाच्या मागील डोंगरावरून अचानक मातीचा ढिगारा कोसळला. हा ढिगारा थेट दुकानाच्या भिंतीवर आदळला व ती भिंत कोसळून विठाबाई यांच्या अंगावर पडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिठेखार गाव जिल्हा प्रशासनाकडून दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित आहे. यापूर्वीही येथे भूस्खलनाच्या घटना घडल्या असून ग्रामस्थांनी वेळोवेळी सुरक्षिततेसाठी भिंत बांधण्याची मागणी केली होती. तत्कालीन कोकण आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काही वर्षांपूर्वी स्वतः पाहणी करून भिंत उभारण्याचे आदेश दिले होते. मात्र पाच वर्षे उलटूनही ती भिंत अद्याप उभारली गेली नसल्याने ग्रामस्थांत संताप आहे. ग्रामपंचायतीने गेल्या वर्षीही सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी विनंती केली होती, परंतु ती दखलपात्र ठरली नाही.
घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. मुरुड तहसीलदार आदेश ढापाल यांनीही तात्काळ पाहणी करून सुरक्षिततेसंदर्भात सूचना दिल्या. ग्रामस्थांनी यावेळी प्रशासनाविरोधात संतप्त भावना व्यक्त करत, “प्रत्येक वेळी अशा दुर्घटनांनंतर केवळ घोषणा व आश्वासने मिळतात; मात्र ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. दरडग्रस्त कुटुंबांना कायमस्वरूपी सुरक्षित निवारा मिळावा,” अशी मागणी केली.
रायगड जिल्ह्यात यापूर्वीही अनेकांना दरडींमुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत आहे.
