शशिकांत मोरे
धाटाव/रोहा : रोटरी क्लब ऑफ रोहा अध्यक्षपद स्वीकारणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. शिक्षण, पर्यावरण, सामाजिक हित या सर्वच क्षेत्रांत रोटरी क्लबने पुढाकार घेतला पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन समाजहिताचे काम करणार असून, दिलेला एक वर्षाचा कालावधी स्मरणीय ठरावा यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ नागरिक सभागृहात रविवारी झालेल्या या भव्य पदग्रहण सोहळ्यास असिस्टंट गव्हर्नर संजय नारकर प्रमुख उपस्थित होते. या वेळी त्यांनी रोटरी क्लब ही संस्था फक्त मानमरातबापुरती नसून तळागाळातील सामान्यांच्या प्रश्नांशी जोडलेली आहे. नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली क्लबचे कार्य अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
रोटरी क्लबचे ब्रीदवाक्य “Unity for Good” याप्रमाणे समाजहितासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांचा या कार्यक्रमात यथोचित सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात अमेरिका आंतरराष्ट्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे नवनीत मोरे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, राष्ट्रीय सेवा योजनेतून राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्राचार्य अतुल साळुंखे, इतिहास संशोधक डॉ. श्रीनिवास वेदक, प्राणीमित्र कुमार देशपांडे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, मुंबई मेट्रो चालवणारी रोह्याची कन्या गार्गी ठाकूर, पर्यावरणप्रेमी राजेंद्र जाधव, प्रसिद्ध रांगोळीकार रुपेश कर्णेकर, रोह्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील, आंतरराष्ट्रीय स्तरावर किक बॉक्सिंगमध्ये यश मिळवणारे प्रभात पोकळे व परी महाडिक, पत्रकार रामनरेश कुशवाह, सागर जैन, तसेच निसर्ग संस्था यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे प्राणीमित्र कुमार देशपांडे यांना त्यांच्या सातत्यपूर्ण प्राणीसेवेसाठी रु. २५ हजारांची मदत मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. याप्रसंगी मावळते अध्यक्ष किरण ताठरे, सचिव प्रदीप चव्हाण, खजिनदार वरुण दिवाण यांनी नव्या कार्यकारिणीकडे पदभार सोपविला. या वेळी वर्षभरात झालेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण विषयक उपक्रमांचा आढावा घेऊन कार्य निरंतर सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब नेहमीच मदतीचा हात देईल, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश भोईर गुरुजी आणि रोटेरियन स्वप्नील धनावडे यांनी तर आभार प्रदर्शन रोटेरियन दिनेश जैन यांनी केले.
